Join us

QX रँकिंगमध्ये भारतात आयआयटी-मुंबई अव्वल; चीनला मागे टाकत भारतातील १४८ संस्था क्रमवारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 8:23 AM

लक्षणीय बाब म्हणजे चीनला मागे टाकत भारतातील तब्बल १४८ शिक्षण संस्थांनी आशियाच्या क्रमवारीत झळकण्यात यश मिळवले आहे.

मुंबई : संशोधन, पायाभूत सुविधा, अध्यापनाचा दर्जा आदी निकषांच्या आधारे आशिया खंडातील उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा निश्चित करणाऱ्या क्यूएस क्रमवारीमध्ये (२०२४) मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी’ने भारतात अव्वल स्थान पटकावले आहे. परंतु, आशिया खंडातील या ८५६ शिक्षण संस्थांच्या यादीत राज्चाचे एकही विद्यापीठ नाही.

लक्षणीय बाब म्हणजे चीनला मागे टाकत भारतातील तब्बल १४८ शिक्षण संस्थांनी आशियाच्या क्रमवारीत झळकण्यात यश मिळवले आहे. गेल्यावर्षी ही संख्या १११ इतकी होती. चीनमधील १३३, जपानमधील ९६ संस्था क्यूएस रँकिंगमध्ये आहेत. तर म्यानमार, कंबोडिया, नेपाळ या देशांनी यात शिरकाव करण्यात यश मिळवले आहे.

भारतात मुंबईची आयआयटी सर्वोत्कृष्ट संस्था ठरली आहे. आशिया खंडात ती गेली तीन वर्षे ४०व्या क्रमांकावर आहे. अर्थातच मागील दोन वर्षे आयआयटी-मुंबई भारतातही अव्वल ठरली. आयआयटी दिल्ली (आशिया रँक ४६) आणि आयआयटी मद्रास (आशिया रँक ५४) यांनीही  दोन वर्षांप्रमाणे आपले अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान ढळू दिलेले नाही.

शैक्षणिक प्रतिष्ठेत भारताची कामगिरी खालावल्याचे ही क्रमवारी दर्शवते. दुसरीकडे संशोधनात मात्र ती वधारली आहे. या निर्देशांकासाठी नऊ भारतीय विद्यापीठांनी आशिया खंडात प्रथम क्रमांक मिळविला आहे, हे विशेष.

काही भारतीय संस्थांची क्रमवारी (आशिया यादी)     चंदिगढ विद्यापीठ - १४९     वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी)- १६३     अण्णा युनिव्हर्सिटी - १७९     कोलकाता विद्यापीठ - १८७

रँकिंगचे निकषशैक्षणिक प्रतिष्ठा, शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क, प्राध्यापकनिहाय शोधनिबंधांची संख्या, पीएचडीधारक शिक्षकांची संख्या, प्राध्यापक संख्येचे आंतरराष्ट्रीय निकष, शैक्षणिक देवाणघेवाण.

क्यूएस क्रमवारीतील भारतीय विद्यापीठांची वाढती संख्या भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील वाढीचे द्योतक आहे. या वाढीला भविष्यात आणखी वाव आहे.- बेन सॉटर, वरिष्ठ उपाध्यक्ष, क्यूएस

टॅग्स :आयआयटी मुंबई