लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयआयटी मुंबईने भारतीय खगोल - भौतिकशास्त्र संस्थेशी करार केला आहे. या सामंजस्य करारामुळे आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना या रोबोटिक दुर्बिणीचा वापर करता येणार आहे. तसेच ही साधने निरीक्षणे आणि माहिती प्रक्रियेसाठी वापरली जाणार आहेत. या निरीक्षणांचा वापर हे विद्यार्थी खगोलशास्त्रीय संशोधनासाठी करू शकतील.
आयआयए अर्थात भारतीय खगोल-भौतिकशास्त्र संस्थेशी सोबतची ही भागीदारी आम्हाला आमच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने एक पाऊल जवळ आणते अशी प्रतिक्रिया आयआयटी मुंबईचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी दिली आहे. २०१८ मध्ये आयआयए अर्थात भारतीय खगोल - भौतिकशास्त्र संस्थेशी आणि आयआयटी मुंबई यांनी संयुक्तपणे (ग्रोथ ) ग्रोथ-इंडिया टेलिस्कोप हा प्रकल्प स्थापित करून कार्यन्वित केला होता. आणखी पुढील ५ वर्षे हा प्रकल्प संयुक्तपणे कार्यन्वित ठेवण्यासाठी ३० ऑगस्ट रोजी हा सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
देशातील पहिली रोबोटिक ऑप्टिकल दुर्बिण
ग्रोथ - इंडिया टेलिस्कोप हा प्रकल्प म्हणजे आयआयए आणि आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त भागीदारीने भारताच्या लडाखमध्ये ०.७ मीटर रुंद क्षेत्रीय दुर्बिणीची स्थापना करण्यात आली आहे. ही देशातील पहिली पूर्णपणे रोबोटिक ऑप्टिकल दुर्बिण आहे. गुरुत्वाकर्षण लहरीच्या घटनांमधून उत्सर्जन, सुपरनोवा आणि पृथ्वीजवळील लघुग्रह यांसारख्या गुणधर्म बदलणाऱ्या वैश्विक स्त्रोतांचा सतत अभ्यास करणे हे आंतरविद्याशाखीय प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रोथ - इंडिया टेलिस्कोपचे संचालन आयआयटी मुंबईच्या १९९४ च्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू आहे.
प्रतिक्रिया
आयआयटी मुंबईच्या तरुण आणि उत्साही विद्यार्थ्यांसोबत आयआयएचा अनुभव हा उत्तम कौशल्य, चांगली निरीक्षणे देणारा ठरला असल्याचे मागील ३ वर्षाच्या निष्कर्षावरून सिद्ध झाले आहे. अशी प्रतिक्रिया आयआयएच्या संचालिका प्रा.अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांनी यावेळी दिली.