आयआयटी मुंबईच्या शिरपेचात ‘मानाचा तुरा’; शिकागोमधील सुपर काॅम्प्युटर संशोधनात ठसा उमटविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 07:35 PM2023-09-10T19:35:51+5:302023-09-10T19:36:10+5:30
शिकागो क्वांटम एक्स्चेंजमध्ये आयआयटी मुंबई सहभागी झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातील घोषणा जी-२०च्या शिखर परिषदेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिकागो क्वांटम एक्स्चेंज हे जागतिक स्तरावरील अभियांत्रिकी विज्ञान संशोधन करणारे एक बौद्धिक केंद्र आहे. त्यामध्ये जगभरातील अनेक प्रगत देश हे सदस्य आहेत. यात जगातील पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. त्यापैकी एक आयआयटी मुंबईचाही समावेश झाला असल्याने येथे होणाऱ्या विविध प्रकारच्या संशोधनात आयआयटी मुंबईलाही ठसा उमटवण्याची संधी मिळाली आहे.
शिकागो क्वांटम एक्स्चेंजमध्ये आयआयटी मुंबई सहभागी झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातील घोषणा जी-२०च्या शिखर परिषदेत केली. यामुळे आयआयटी मुंबईला जगातील पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांच्या यादीत सामील होण्याचा बहुमान मिळाला आहे. भारतासाठी ही अत्यंत सन्मानाची बाब असल्याचे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी शुभेच्छाही दिल्या.
आयआयटी मुंबई क्वांटम माहिती विज्ञान, हवामान विज्ञान, ऊर्जा विज्ञान, प्रगत मायक्रो इलेक्ट्रॉनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विज्ञान आणि डेटा विज्ञान यासारख्या क्षेत्रात सहकार्याने संशोधन करणार आहे.
दुसऱ्या सुपर कॉम्प्युटरच्या संशोधन चमूत सहभाग
- जगातील दुसरा क्वांटम सुपर कॉम्प्युटर तयार करण्यासाठी शिकागो विद्यापीठ टोकियो विद्यापीठ, आयबीएम, गुगल, अमेरिकेतील काही विद्यापीठासह आयआयटी मुंबईचाही यामध्ये सहभाग असणार आहे.
- यासोबत जगातील विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात सखोल संशोधन करण्यासाठी आयआयटी मुंबईचा सहभाग राहणार असून, ही देशासाठी मोठी सन्मानाची बाब असल्याचे आयआयटी मुंबई प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संशोधनासाठी सहकार्य मिळणार
- अभियांत्रिकी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारत अधिक संशोधन करू इच्छितो. यासाठी शिकागो विद्यापीठात इतर विद्यापीठासोबत सहकार्य करण्यास आणि अमेरिका-भारत संशोधन क्षेत्रात भागीदारी करण्यास इच्छुक आहे.
- त्यात आता भारतातील आयआयटी मुंबईचा समावेश हा शिकागो क्वांटम एक्स्चेंजमध्ये झाल्याने अनेक प्रकारच्या संशोधनासाठी भारताला मदत मिळणार असल्याचे शिकागो-दिल्ली संयुक्त केंद्राचे संचालक आणि प्रिझर स्कूल ऑफ मॉलिक्युलर इंजिनिअरिंग अमेरिकेचे प्राध्यापक सुप्रतीक गुहा यांनी सांगितले.