आयआयटीचा पालिकेला ३८ कोटींचा ‘दर्जेदार’ सल्ला! सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी सामंजस्य करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 13:09 IST2025-03-17T13:09:41+5:302025-03-17T13:09:58+5:30
७०१ - किलोमीटर रस्त्यांचे पालिका दोन टप्प्यात काँक्रिटीकरण करणार आहे. आयआयटीची या रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी मदत मिळणार आहे.

आयआयटीचा पालिकेला ३८ कोटींचा ‘दर्जेदार’ सल्ला! सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी सामंजस्य करार
मुंबई : मुंबईत सध्या चालू असलेल्या आणि भविष्यात सुरू होणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचा दर्जा, गुणवत्ता निरीक्षण यासाठी तज्ज्ञ सल्लागार व त्रयस्थ संस्था म्हणून आयआयटी मुंबई काम पाहत आहे. यासाठी पालिका जवळपास ३८ कोटींचे शुल्क मोजणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील शहर आणि पूर्व विभागाचे प्रत्येकी १ आणि पश्चिम विभागातील ३, असे एकूण ५ पॅकेज आणि पहिल्या टप्प्यातील एका पॅकेजच्या तपासणीसाठी पालिका आणि आयआयटीमध्ये सामंजस्य करार झाला आहे.
मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामध्ये मुंबई शहर व उपनगरात पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर, असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. कामावर देखरेखीसाठी अभियंत्यासह गुणवत्ता देखरख संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय तज्ज्ञ सल्लागार म्हणून पालिका आयआयटी मुंबईची मदत घेतली जात आहे. करारानुसार रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना जाणीवपूर्वक कमी गुणवत्तेचे काम होऊ नये म्हणून दक्षता घेणे, तसेच काँक्रिटीकरणावेळी अजाणतेमुळे होणाऱ्या चुका टाळण्यासाठी मार्गदर्शन आणि अत्युच्च गुणवत्तेची काळजी घेणे यासाठी आयआयटी मार्गदर्शन करत आहे.
अशी आहे आयआयटीच्या कामाची व्याप्ती
रस्त्यांच्या पुनर्बांधणी - देखभालीकरिता योग्य पद्धत निवडण्याकरिता मार्गदर्शन.
प्रकरणनिहाय आराखड्यांचे पुनरावलोकन.
कामासंबंधित कार्यशाळांचे आयोजन.
मिक्स डिझाईन संबंधी गुणवत्ता हमी निकषानुसार तपासणी
गुणवत्ता नियंत्रण तपासण्यांचे अहवाल तपासणी.
तांत्रिक लेखापरीक्षा अहवाल तयार करणे.
गुणवत्ता हमीकरिता वेळोवेळी स्थळ पाहणी करणे.
आकस्मिक भेटी
आयआयटीकडून आकस्मिक भेटी, कार्यस्थळास प्रत्यक्ष भेट देणे, त्याबाबतची निरीक्षणे नोंदविणे, भेटीच्या दरम्यानची निरीक्षणे आणि त्यावरील सल्ला याबाबत वेळोवेळी अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांसोबत प्रतिसाद मिळवणे अपेक्षित आहे.
शिवाय काँक्रीट प्लांटमध्ये मटेरियल बनविण्यापासून ते पूर्ण झालेल्या काँक्रीट रस्त्याच्या विविध चाचण्यांही संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
त्यात क्युब टेस्ट, कोअर टेस्ट, स्लम्प कोन टेस्ट, ड्युरॅबिलिटी टेस्ट, फिल्ड डेन्सिटी टेस्ट आदी तांत्रिक चाचण्यांचा समावेश आहे.
७०१ - किलोमीटर रस्त्यांचे पालिका दोन टप्प्यात काँक्रिटीकरण करणार आहे. आयआयटीची या रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी मदत मिळणार आहे.