मुंबई : शरीरातील कर्करोगाच्या वाढणाऱ्या पेशींना मारण्यासाठी केमोथेरपी दिली जाते. केमोथेरपीमुळे कर्करोगाच्या पेशींसह लाल रक्तपेशी आणि पांढºया रक्तपेशीसुद्धा मरतात. त्यामुळे काही रुग्णांना असह्य वेदना होतात. या वेदना इतक्या त्रासदायक असतात की अनेकदा रुग्ण ही थेरपी अर्ध्यावरच सोडून देतात. मात्र आता ही थेरपी वेदनारहित होऊ शकते, यासाठी पवई येथील आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे.
आयआयटी मुंबईतील बायोसायन्सेस अॅण्ड बायोइंजिनीअरिंग विभागातील शास्त्रज्ञांनी कर्करोगावर नॅनोथेरपी विकसित केली आहे. या विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ रिंती बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले. आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी एक उपकरण बनवले आहे यातून दोन सूक्ष्म फुगे रुग्णाच्या रक्तवाहिनीत सोडले जातात. यातील एका फुग्यामध्ये केमोथेरपीची औषधे असतात तर दुसरा गॅसचा फुगा पहिल्याला ट्युमरपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. त्यामुळे रुग्णाच्या चांगल्या पेशींना धक्का पोहोचत नाही. याचा प्रयोग प्रयोगशाळेत तयार केलेल्या पेशी (इन-विट्रो) तसेच प्राणी (इन-व्हिवो) या दोन्हींवर करण्यात आला आहे. याद्वारे केमोथेरपीच्या औषधांचा थेट ट्युमरवर हल्ला करता येतो. नॅनो बबल्सद्वारे केमोथेरपी दिल्याने रुग्णाची कर्करोगातून वाचण्याची शक्यताही शंभर टक्के वाढतेअसे प्रयोगातून दिसून आले आहे.कर्करोगाच्या गाठींचा वेधनॅनोथेरपीतील औषधाचा फुगा २०० नॅनोमीटर तर गॅसचा फुगा हा ५०० नॅनोमीटर आकाराचा असतो. पहिल्या फुग्याला नॅनोकॅप्सूल तर दुसºया फुग्याला नॅनोबबल म्हटले गेले आहे. अल्ट्रासाउंडद्वारेच कर्करोगाच्या गाठींचा वेध घेत हे फुगे तिथपर्यंत पोहोचवले जातात. गाठीपर्यंत फुगे पोहोचले की गॅसचा फुगा फुटतो आणि त्यामुळे औषधांच्या फुग्याला गाठींमध्ये प्रवेश करण्यासाठी मार्ग बनतो. या प्रक्रियेला यूएसजी गायडेड कॅन्सर थेरपी असेही म्हटले जाते.