रोबोसह आधुनिक तंत्रज्ञान ठरले आयआयटी टेकफेस्टचे आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 07:55 AM2018-12-16T07:55:06+5:302018-12-16T07:56:31+5:30
नवीन तंत्राविष्कार : पालक, विद्यार्थ्यांशी रोबोने साधला संवाद
मुंबई : मुंबई आयआयटी टेकफेस्टच्या दुसऱ्या दिवशीही शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकांनी गर्दी पाहायला मिळाली. नवीन तंत्राविष्कार, तसेच रोबोसह, आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रकल्प हे या टेकफेस्टचे आकर्षण ठरले.
विज्ञान - तंत्रज्ञानात होणारे आविष्कार पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक येथे हजर होते. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय आणि आयआयटीतील विद्यार्थ्यांची प्रदर्शने, रेसिंग कार्स व नवीन संकल्पनांवर आधारित प्रदर्शने पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होती. त्यातही स्विडनचा ‘फुराट’ हा रोबोट, अमेरिकेतून आलेला ‘मग्नी’ हा रोबोट, भारतीय बनावटीचा रोबोट जे संवाद साधत होते, ते सर्वांचेच कुतूहल जागृत करणारे ठरले.
जपानच्या तंत्रज्ञांनी बनविलेला अँड्रॉइड यू हा मानवासारखा दिसणारा रोबो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. एखाद्या महिलेप्रमाणे हुबेहूब बनविण्यात आलेला हा रोबो, माणसांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला सहजपणे उत्तर देत होता.
या प्रदर्शनात अनेक नवीन आणि अत्याधुनिक संकल्पनांवर आधारित प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. जपानचा हॅकबेरी हा कृत्रिम हात जो आपल्यातील सेन्सरने मानवाच्या हाताच्या स्नायूनुसार हालचाली करतो, ज्याचा अपंगत्व आलेल्यांना चांगलाच फायदा होऊ शकतो. जपानने हा सेन्सर खास ज्याने आपला हात गमावला आहे, त्यांच्यासाठी केला आहे.
टेकफेस्टमधील हृदयाच्या ठोक्यांची नोंद जतन करून ठेवणारा स्मार्ट स्टेथोस्कोपही बराच चर्चेत आहे. यामुळे कितीही गोंधळात डॉक्टरांना रुग्णाचे ठोके अगदी स्पष्ट आणि व्यवस्थित ऐकू येतील. या सोबतच यामध्ये ते जतनही करता येतील. डॉक्टर नंतर आरामात ते ऐकू शकतील.
टेकफेस्टमध्ये फिरणारा सोलार चाय ठेलाही चर्चेत आहे. प्राध्यापक चेतन सोलंकी आणि जयंद्रन वेंकटेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तो तयार केला आहे. या सौरठेल्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार असून असे अनेक सौरठेले बनविण्याचा विचार सुरू आहे. त्यामधून अनेक महिला सक्षम होऊ शकतील अशी माहिती या प्रकल्पाच्या टेक्निकल डिपार्टमेंटचे प्रसाद सावंत यांनी दिली. या सौरठेल्यातून सध्या दिवसाला २५० ते ३०० चहाचे कप दिले जातात.
भारतीय कंपनी सिरेनचा ‘निनो’ हा रोबो साºयांचे लक्ष वेधून घेत होता. लहान मुलांना शिक्षण देणारा, तसेच अभ्यास करून त्यांना कंटाळा आल्यावर डान्स करून त्यांचे मनोरंजन करणारा निनो शालेय मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. घरगुती कामे व घराच्या सुरक्षेसाठी प्रदर्शनात ठेवण्यात आलेला इंड्रो 3.० हा रोबो पाहण्यासाठीही प्रचंड गर्दी होती. हा रोबो ४.५ फूट उंच असल्याने अनेक जण त्याच्यासह सेल्फी काढत होते.
‘त्या’ महिलांसाठी सेल्फ डिटेक्टिव डिव्हाइस
बलात्कारापासून वाचलेल्या, मात्र तरीही त्याबद्दल साशंंक असलेल्या मुली आणि महिलांसाठी सेल्फ डिटेक्टिव डिव्हाइसची संकल्पना टेकफेस्टमध्ये पाहायला मिळाली. इस्राइलच्या शमून कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची ही संकल्पना आहे. याचा वापर घरच्या घरी केला जाऊ शकतो. या डिव्हाइसमध्ये अंतर्गत कॅमेरा असून, यामध्ये अंतर्गत जखमा झाल्या असल्यास समजू शकेल, तसेच डीएनएचे नमुने गोळा करण्यासाठी, एचआयव्ही टेस्टसाठी, प्रेग्नंसी टेस्टचही सुविधा आहे. कधी-कधी बलात्कारपीडित स्त्रिया डॉक्टरकडे जाण्यास घाबरतात. अशा वेळी निदान कारण्यासाठी या डिव्हाइसचा वापर होऊ शकतो.