रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पवईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) सुमारे ५४५ एकर जागेवर वसलेल्या संकुलातील कार्बन फूटप्रिंटचे नियमित मोजमाप करून त्याचे उत्सर्जन रोखण्याकरिता एक शाश्वत धोरण तयार करण्यात येणार आहे.
आयआयटी संकुलातील संसाधनांचा अपव्यय टाळून त्यांचा प्रभावी वापर व्हावा, या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून हे मोजमाप केले जाणार आहे. या धोरणामध्ये आयआयटीतील प्रत्येक विभागांना सामावून घेतले जाईल. एनर्जी सायन्स विभागाचे प्रा. शिरीष केदारे यांनी ६ मे रोजी प्रा. सुभाशिष चौधरी यांच्याकडून संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानिमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या योजनेची माहिती दिली.
बालपण ग्रांटरोडमध्ये गेलेले प्रा. केदारे मुंबई आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. गेली अनेक वर्षे ते आयआयटीत शिकवित आहेत. आयआयटी होणारे संशोधन आणि तंत्रज्ञान उद्योगजगत आणि लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
येणारा प्रत्येक उन्हाळा तापदायक!
यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक आहोत, असे दरवर्षी म्हटले जाते. परंतु, यंदाचा नव्हे तर यापुढे येणारा प्रत्येक उन्हाळा अधिकाधिक तापदायक आणि असह्य असा असेल. क्लायमेट चेंज हे कटू, पण वास्तव आहे. आणि त्याकडे लक्ष देण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी सरकारच्या मदतीने कंपन्यांना त्यांचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.
प्रा. शिरीष केदारे - सीव्हीवर कार्बन फूटप्रिंटचा उल्लेख
पर्यावरणीय बदलांविषयी अत्यंत जागरूक असलेले प्रा. केदारे आपल्या सीव्हीवर आणि प्रत्येक सादरीकरणाच्या शेवटी ते स्वत किती कार्बन उत्सर्जन करतात याचा उल्लेख आवर्जून करतात. आपल्या कुटुंबाच्या कार्बन फूटप्रिंटचाही आपण हिशोब ठेवत असतो, असे त्यांनी सांगितले.