Join us  

आयआयटियन्सचे ‘कोट’कल्याण! २५ विद्यार्थ्यांना वार्षिक एक कोटींहून अधिक पगाराचे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 8:20 AM

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजांमधील प्लेसमेंटच्या थंड प्रतिसादामुळे आयआयटी.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटचा पहिला टप्पा सुरू असून, विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून आतापर्यंत १५ हजारांहून अधिक जॉब ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १२२४ जॉब ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या असून, २५ विद्यार्थ्यांना वार्षिक १ कोटीपेक्षा अधिक पगाराचे पॅकेज मिळाले आहे. १५ डिसेंबरपर्यंत प्लेसमेंटचा पहिला टप्पा सुरू राहील.

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजांमधील प्लेसमेंटच्या थंड प्रतिसादामुळे आयआयटी. मुंबईलाही फटका बसतो की काय, अशी चर्चा होती. मात्र, यंदाच्या प्लेसमेंट टप्प्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला. चारशेहून अधिक कंपन्या यात सहभागी झाल्या. अमेरिका, जपान, तैवान, कोरिया, नेदरलँड, सिंगापूर अशा ठिकाणांहून विद्यार्थ्यांना ७१ आंतरराष्ट्रीय जॉब ऑफर्स देण्यात आल्या, त्यापैकी ६३ ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या असल्याचे प्लेसमेंट सेलकडून सांगण्यात आले आहे. 

यंदा प्रायव्हेट इक्विटी फर्म्सकडून वाढलेला प्रतिसाद हे यंदाच्या टप्प्याचे वैशिष्ट्य ठरत असून, आतापर्यंत जीआयसी सिंगापूर, बेन कॅपिटल, एलिव्हेशन कॅपिटल अशा प्रमुख व मोठ्या फर्म्सने आयआयटी मुंबई प्लेसमेंटमध्ये सहभाग घेतला आहे.

या कंपन्यांचा आतापर्यंत सहभाग आयआयटी मुंबई प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात अमेरिकन एक्स्प्रेस, होंडा जपान, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, मॉर्गन स्टॅनले, स्प्रिंकलर अँड काँग्लोमिरेट्स, मॅकेन्झी अँड कंपनी, अदानी, टाटा, रिलायन्स अशा विविध कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.  कंपन्यांकडून अनेक विद्यार्थ्यांच्या मुलाखती काही ऑनलाइन पद्धतीने, तर काही प्रत्यक्षात घेण्यात आल्या आहेत. अद्याप टप्प्याची सांगता झाली नसल्याने यामध्ये भर पडून १५ डिसेंबरपर्यंत देशातील आणि देशाबाहेरील ३०० कंपन्या सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :आयआयटी मुंबई