IIT चे संकेतस्थळ ठरतेय विद्यार्थ्यांसाठी वरदान, १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
By स्नेहा मोरे | Published: October 24, 2023 07:26 PM2023-10-24T19:26:53+5:302023-10-24T19:27:13+5:30
हे विद्यार्थी मुंबईसह मंडी, धनबाद, गांधीनगर, दिल्ली, कानपूर, गुवाहाटी येथील आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आयआयटी मुंबईत दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणानंतर विशिष्ट विद्यार्थ्यांना डावलले जात असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यानंतर आता आयआयटी मुंबई प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नव्या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे, या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्वरित मदत व मार्गदर्शन करणे सोपे होत आहे. आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती आणि जमातीतील विद्यार्थ्यांसाठी हे संकेतस्थळ सुरू केले आहे.
बी. टेक., एम. टेक., एमएससी, पीएच. डी. आणि पदव्युत्तर पदवी घेतलेल्या अंतिम वर्षातील एससी-एसटी प्रवर्गातील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर तक्रारी नोंदविल्या आहेत. हे विद्यार्थी मुंबईसह मंडी, धनबाद, गांधीनगर, दिल्ली, कानपूर, गुवाहाटी येथील आहेत.
आतापर्यंत या संकेतस्थळावर अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी मांडल्या आहेत. त्यावर प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनाबरोबरच भाषेशी निगडीत आणि इतर समस्यांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. हे संकेतस्थळ १ ऑक्टोबरपासून सुरू झाले. त्यावर देशभरातून शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी मदतीसाठी विविध अडचणी नोंदविल्या आहेत. संकेतस्थळाद्वार सध्या आयआयटीच्या २०२४ च्या पदवीधर बॅचला बायोडेटा, मुलाखतीचे प्रश्न, उद्योगतज्ज्ञांद्वारे वैयक्तिक मॉक मुलाखत, नोकरीच्या संधी, पागाराच्या वाटाघाटी इत्यादीविषयी मार्गदर्शन केले जात आहे.