खलील गिरकरमुंबई : मुंब्रा-कौसा येथील चाळीत राहून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या एजाज अहमद या तरुणाने, नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत देशभरातून २८२वा क्रमांक पटकावला आहे. त्यांची आयएएस म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी यूपीएससी परीक्षेत ६९७ वा क्रमांक पटकावल्यानंतर त्यांची आयआरएस म्हणून निवड झाली होती. सध्या नागपूर येथे सहायक आयकर आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या एजाज यांनी आयएएस होण्याचे ध्येय सातव्या प्रयत्नात पूर्ण केले आहे. मुंब्रा कौसा येथील गुलशन-ए-फिरदौस चाळीत राहून आयएएसपर्यंतचा प्रवास मुंब्रावासीयांसाठी व सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणारा आहे.मुंब्रा परिसराकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्वग्रहदूषित असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. ज्या परिसराची ओळख पोलिसांच्या कोम्बिंग आॅपरेशनमुळे सातत्याने होते, अशा परिसरात राहून देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या व कठीण अशा स्पर्धात्मक परीक्षेत आयएएस म्हणून निवड होणे, ही एजाज अहमद यांच्यासह मुंब्रावासीयांसाठीही प्रतिष्ठा वाढविणारी घटना आहे.उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे मूळ गाव असलेल्या एजाज यांचे वडील लष्करात लेफ्टनंट असल्याने, त्यांचे कुटुंबीय सुरुवातीला गाझीपूरमध्ये, नंतर मुंब्य्रामध्ये स्थायिक झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण उत्तर प्रदेशमध्ये घेतल्यानंतर, एजाज यांनी मुंब्य्रामधील भारत महाविद्यालयात ११ वी व १२ वीचे शिक्षण घेतले. त्यानंतर, ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयातून मरिन बायोलॉजी विषयात बीएसस्सीची पदवी मिळविली. पदवी मिळविल्यानंतर त्यांनी जामिया मिलीया विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली.रशीद कम्पाउंडमध्ये राहताना स्पर्धा परीक्षेविषयी माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी या परीक्षा देण्याचे ठरविले. सुरुवातीला त्यांनी मुंब्य्रातच राहून अभ्यास सुरू केला. मात्र, त्यानंतर योग्य मार्गदर्शनासाठी ते दिल्लीला गेले. गतवर्षी त्यांची यूपीएससीमध्ये निवड झाली. मात्र, ६९७वा क्रमांक मिळाल्याने, त्यांना आयएएस होता आले नव्हते. तरीही निराश न होता, चिकाटीने प्रयत्न करून यंदा त्यांनी २८२वा क्रमांक मिळविला.काही वर्षांपूर्वी झालेल्या इशरत जहाँ प्रकरणामुळे कुप्रसिद्धीत आलेल्या रशीद कम्पाउंडमध्ये राहणाऱ्या एजाज यांच्या यशामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये अहमद यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. एजाज यांचे मित्र प्रा.हसन मुलाणी यांनी त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला व त्यांच्या यशाचा सकारात्मक परिणाम मुंब्रा-कौसा परिसरातील विद्यार्थ्यांवर होईल, असा विश्वास व्यक्त केला.निर्णय ज्याचा त्याने घ्यावाआयुष्यात बदल घडवायचा असेल, तर तो स्वत:पासून घडवायला हवा, या महात्मा गांधीजींच्या विचारांवर आपण नेहमी चालण्याचा प्रयत्न केला, असे एजाज म्हणाले. आपल्या उदाहरणातून जगासमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या प्रवासातून प्रेरणा घेऊन मुंब्रा- कौसा परिसरातील अनेक जण स्पर्धात्मक परीक्षांकडे वळतील व त्यांना यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रशीद कम्पाउंड परिसरात राहताना, सर्रास सुरू असलेल्या ड्रग्जच्या व्यसनांकडे वळायचे की, आयएएस होऊन देशसेवा करायची याचा निर्णय प्र्रत्येकाने आपापल्या पद्धतीने घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.स्वत:च्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवून कठोर परिश्रम घेतले, तर कोणतेही ध्येय दूर नसते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे, यश आपोआप मागे चालत येईल, असा सल्ला त्यांनी दिला. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना दृष्टी व्यापक होते. त्यामुळे यश किंवा अपयशाचा विचार न करता, देशासाठी काहीतरी करण्याचे लक्ष्य समोर ठेवून काम करण्याची गरज एजाज अहमद यांनी व्यक्त केली.
एजाज यांची ‘आयएएस’ भरारी, मुंब्य्रातील तरुणाचा प्रेरणादायी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 6:35 AM