Join us

पावसाचा इजा, बिजा, तिजा; सलग तीन दिवसांपासून मुंबईत झोडपधार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 5:11 AM

वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने मुंबई आणि परिसराला झोडपून काढले आहे. ‘२६ जुलै’च्या ट्रेलरनंतर गुरुवारी पुन्हा एकदा पावसाने शहर आणि परिसरात शब्दश: धुमाकूळ घातला. धुवाधार पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे आणि बस वाहतूक कोलमडली. अनेकांना कार्यालयातून लवकर सोडून देण्यात आले. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील शाळा-कॉलेजांना सुटी जाहीर करण्यात आली होती. पावसाचा वेग शुक्रवारीही कायम राहणार आहे.

हवामान खात्याने मुंबईला दिलेला रेड अलर्ट पावसाने गुरुवारी खरा ठरविला. दहीसर, मुलुंडपासून कुलाब्यापर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: मुंबईचा चक्का जाम केला. विशेषत: दक्षिण मुंबईतल्या कोसळधारने लोकलला ऑफ दी ट्रॅक केले. तर रस्त्यांवर साचलेल्या पाण्याने वाहतूक व्यवस्थेला ब्रेक लावला. एकंदर मुंबईत पावसाचा वेग शुक्रवारीही कायम राहणार असून, हवामान खात्याने ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, शनिवारीही रायगडात पावसाचा जोर राहील. रविवारनंतरच जोर कमी होण्याचा अंदाज आहे. 

आणखी तीन दिवस राहणार जोर

कमी दाबाच्या क्षेत्राचा असर कायम असून, याचा परिणाम म्हणून मध्य भारत, कोकण, गोव्याचा किनारपट्टी भाग, घाट परिसरात पुढील ३ ते ४ दिवस पावसाचा जोर राहील. तर गेल्या २४ तासांत मुंबईत बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग

मुंबईकरांना सूर्यदर्शन नाही

१५ जुलैपासून सातत्याने मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचे धुमशान सुरू आहे. अधूनमधून पाऊस विश्रांती घेत असला तरी आकाशात ढगांची दाटी झालेली असते. त्यामुळे गेल्या दहा-बारा दिवसांपासून मुंबईकरांना सूर्यदर्शन झालेले नाही.