‘मी पैसे वसूल करेन’
By admin | Published: May 21, 2015 01:08 AM2015-05-21T01:08:41+5:302015-05-21T01:08:41+5:30
मॉडेल आणि अभिनेत्री शिखा जोशी हिच्या मृत्यूनंतर अडचणीत सापडलेल्या कॉस्मेटिक सर्जन डॉ. विजय शर्मा यांचा जबाब आज वाकोला पोलिसांनी नोंदविला.
गौरी टेंबकर-कलगुटकर ञ मुंबई
मॉडेल आणि अभिनेत्री शिखा जोशी हिच्या मृत्यूनंतर अडचणीत सापडलेल्या कॉस्मेटिक सर्जन डॉ. विजय शर्मा यांचा जबाब आज वाकोला पोलिसांनी नोंदविला. या जबाबात शिखानेच मला पैसे वसूल करण्याबाबत धमकी दिली होती, असे म्हटल्याचे वाकोला पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणी अधिक पुरावे गोळा करत आहेत.
शिखा हिचा मृत्यूपूर्वीचा जबाब मोबाइलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला असल्याचा दावा तिची मैत्रीण मधू हरती पठाणने केला आहे; ज्यात शिखाने डॉक्टर शर्मा यांना तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरविले आहे. त्यामुळे वाकोला पोलिसांनी डॉक्टर शर्मा यांना जबाब देण्यासाठी बुधवारी पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानुसार आज डॉक्टर शर्मा यांनी पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदविल्याचे वर्सोवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांनी सांगितले. या जबाबाबद्दल विचारले असता डॉक्टर शर्मा आणि शिखाची २००५ साली झालेली पहिली भेट, तिची सर्जरी, त्यानंतर सर्जरीचा तिला त्रास होत असल्याचे सांगत दोघांमध्ये झालेला वाद, डॉक्टरविरोधात विनयभंगाची तक्रार, भावासोबत मिळून डॉक्टरच्या खारमधील क्लिनिकवरील दगडफेक याबाबत सांगितले. ‘तुझी पुन्हा सर्जरी करावी लागेल, त्यासाठी खर्च होईल’ असे मी तिला सांगितल्यानंतर शिखाने २०११ रोजी मला धमकी देत ‘मी पैसे वसूल करेन’, असे सांगितले, असे डॉक्टरांनी कबुली जबाबात म्हटल्याचे हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘मी तिला न्यायालयातच तारखेला पाहिलेय, त्याव्यतिरिक्त तिच्याशी माझे बोलणे किंवा भेटणे झालेले नाही’, असेही डॉक्टरने जबाबात म्हटले आहे. आम्ही आज डॉक्टरचा जबाब नोंदविला असून तिच्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत, तसेच संबंधित व्हिडीओ क्लिपचीही सत्यता पडताळून पाहण्याचे काम सुरू आहे. हे सर्व अहवाल येताच पुढील कायदेशीर पाऊल आम्ही उचलू, असेही हजारे म्हणाले.
२०१३ मध्येही आत्महत्येचा व्हिडीओ !
शिखाने २०१३ मध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ज्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग तयार करून तिने त्याची सीडी माझ्या क्लिनिकसमोर असलेल्या ‘मेलबॉक्स’मध्ये टाकली होती. ज्यात एक पत्रदेखील होते, असेही डॉक्टरने पोलिसांना सांगितले होते. हे पत्र आणि सीडी डॉक्टरने खार पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.
हुज दॅट ‘मेन’
शिखाने तिच्या मृत्यूपूर्वी काढलेल्या क्लिपमध्ये डॉक्टरसह ‘फेड अप विद मेन’ अशा आशयाचा जबाब दिला आहे. त्यानुसार डॉक्टरव्यतिरिक्त अजून काही व्यक्ती तिच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानुसार शिखाच्या मोबाइलचे सीडीआर काढून त्याची पडताळणी पोलीस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.