अवैध प्राणी वाहतूक महागात, १२,५७,९२० रुपयांची दंड वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 03:19 AM2019-11-04T03:19:47+5:302019-11-04T03:19:56+5:30
वर्षभरात राज्यातील ४३७ वाहनांवर कारवाई, १२,५७,९२० रुपयांची दंड वसुली
मुंबई : केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील प्राणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे वाहन चालकांना महागात पडले आहे. वर्षभरात राज्यातील ४३७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांकडून १२,५७,९२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
राज्य परिवहन विभागाच्या ५० आरटीओने एप्रिल, २०१८ ते मार्च, २०१९ या वर्षभरात एकूण ११,३२५ वाहनांची तपासणी केली होती. या तपासणीत ४३७ वाहने दोषी आढळली.
यामध्ये सर्वात जास्त जळगाव आरटीओची वाहने असून, ती ६६ आहेत. ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पिंपरी चिंचवड, बीड, अकोला, नागपूर शहर, वर्धा गडचिरोली, नंदुरबार, नागपूर ग्रामीण, अंबेजोगाई, पनवेल, बोरीवली, वसई, नागपूर पूर्व या विभागांत वर्षभरात एकही वाहन दोषी आढळले नाही.
राज्यभरातून एकूण १२,५७,९२० रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली विभागाने सर्वाधिक २,६५,००० रुपयांची वसुली केली, तर भंडारा विभागाने सर्वात कमी २,००० रुपयांची वसुली केली आहे. या कारवाईत ३९ वाहन चालकांचा परवाना आणि ७० वाहनांचा परवाना रद्द करण्यात आला आहे, तसेच २५ वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील प्राणी वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी, असे परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व प्रादेशिक अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना जारी केले आहे.
यानुसार केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार, प्राण्यांची वाहतूक करताना वाहनांमध्ये त्यानुसार बदल हे प्राण्यांच्या मानकांनुसार करायला हवेत. प्रत्येक प्राण्यासाठी पक्क्या विभाजकासह स्वतंत्र जागा असावी, अशी अट आहे. नियमांचे पालन न केल्यास वाहतूकदारांवर कारवाई करण्यात येते.