Join us  

स्मशानभूमीत बेकायदा फोर-जी टॉवर

By admin | Published: January 15, 2016 1:52 AM

चंदनवाडी येथील हिंदू स्मशानभूमीच्या जागेवर रिलायन्सने बेकायदा फोर-जी टॉवर उभारला आहे़ ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यावर, काँग्रेसने गुरुवारी या स्मशानभूमीबाहेर आंदोलन केले़

मुंबई : चंदनवाडी येथील हिंदू स्मशानभूमीच्या जागेवर रिलायन्सने बेकायदा फोर-जी टॉवर उभारला आहे़ ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यावर, काँग्रेसने गुरुवारी या स्मशानभूमीबाहेर आंदोलन केले़ या प्रकरणाची आयुक्त अजय मेहता यांनीही गंभीर दखल घेतली असून, कारवाईचे संकेत दिले आहेत़उद्याने, मैदाने, मोकळ्या जागा यांच्या कोपऱ्यात फोर-जी टॉवर बांधण्यात यावेत, या अटीवर पालिकेने रिलायन्स कंपनीला टॉवर उभारण्याची परवानगी दिली होती़ मात्र, कंपनीने दोन दिवसांपूर्वी द बॉम्बे हिंदू बर्निंग व ब्युरल ग्राउंड कमिटीच्या खासगी स्मशानभूमीची १५ फुटांची आवार भिंत तोडून आत प्रवेश करत, पाइलिंग मशिनने खोदकाम सुरू केले आहे़ त्यामुळे येथे पुरण्यात आलेले लहान मुलांचे अवशेष बाहेर आले आहेत़ चार हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या स्मशानभूमीमध्ये सिमेंट काँक्रिटचे फाउंडेशन तयार करताना पालिकेच्या सी विभाग कार्यालयाची, तसेच आरोग्य विभागाची परवानगी घेतलेली नाही़ हा प्रकार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कानावर घालताच, तेथील कामगारांनी साहित्य टाकून पळ काढला़ संबंधितांवर एफआयआर दाखल करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर यांनी केली़ (प्रतिनिधी)- पालिका आयुक्त अजय मेहता यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, एमआरटीपी अंतर्गत संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिल्याचे आंबेरकर यांनी सांगितले़