बेकायदेशीर ‘मॉडीफाय’ कार जप्त
By admin | Published: May 27, 2017 03:01 AM2017-05-27T03:01:54+5:302017-05-27T03:01:54+5:30
बेकायदेशीरपणे मॉडीफाय केलेली कार, अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) जप्त केली आहे. निस्सान कंपनीचे चारचाकी वाहन ‘मॉडीफाय’ करत,
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेकायदेशीरपणे मॉडीफाय केलेली कार, अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) जप्त केली आहे. निस्सान कंपनीचे चारचाकी वाहन ‘मॉडीफाय’ करत, त्या कारला २४ फुटी आलिशान ‘लिमोझीन’ गाडीचे स्वरूप दिले होते. या बेकायदेशीर गाडीवर अंधेरी आरटीओने कारवाईचा बडगा उगारला.
व्ही. बीनू या नागरिकाने ही कार जुहू येथे पाहिली. या कारचा पाठलाग केल्यानंतर अंधेरी येथे कारचे फोटो घेतले. या कारमध्ये एलईडी स्क्रीन, बार, छोटा रेफ्रीजरेटर अशा अन्य सुविधाही बसवल्याचे निदर्शनास आले. बीनूने हे फोटो आरटीओ विभागातील भरारी पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक आनंदराम वागळे यांना पाठवले. वागळे यांना माहिती मिळताच, त्यांनी गाडी उभी असलेल्या ठिकाणी धाव घेतली. गाडीची कागदपत्रे आणि चौकशी करत असताना, गाडी बेकायदेशीरपणे मॉडीफाय केल्याचे उघडकीस आले. परिणामी, गाडीमालक सरणजीत सिंग याच्यावर कारवाईचा बडगा उगारत गाडी जप्त केली. त्याचबरोबर, या वाहनाची नोंदणी रद्द केली आहे.
आरटीओ परवानगी चालकांच्या हिताची
बेकायदेशीरपणे आरटीओची परवानगी न घेता गाडीत बदल करणे, हे चालकाच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने हिताचे ठरत नाही. मॉडीफाय केल्याने गाडीच्या ब्रेकमध्येदेखील बदल करावे लागतात. त्यामुळे नवीन ब्रेक यंत्रणा बसवल्यानंतर, कार चालकाला ती हाताळण्यास अडचणीची ठरू शकते. परिणामी, कोणतेही वाहन मॉडीफाय करण्यापूर्वी आरटीओची परवानगी घेणे चालकांच्या हिताचे असल्याचे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
अशी करा ‘मॉडीफाय’ कार
दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये बदल करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात नियम ५७ (१) नुसार एक अर्ज उपलब्ध आहे. हा अर्ज भरून गाडीमध्ये योग्य ते बदल करणे शक्य आहे. नवीन रूप दिलेल्या गाडीची योग्य नोंदणी झाल्यानंतर, त्या गाडीला आरटीओची परवानगी मिळते.
याआधीही
‘मॉडीफाय’वर कारवाई
जून २०१६ मध्ये परिवहन आयुक्त कार्यालयाच्या भरारी पथकाने, मालाड येथील मॉडीफाय ‘दुचाकी’वर कारवाई केली होती. आॅक्टोबर २०१६ मध्ये नवी मुंबई आरटीओने दोन बेकायदेशीर मॉडीफाय कारवर जप्तीची कारवाई केली होती.