बेकायदा नाइटलाइफ अयोग्यच
By admin | Published: April 5, 2015 01:00 AM2015-04-05T01:00:52+5:302015-04-05T01:00:52+5:30
मुंबईतल्या नाइटलाइफवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले असतानाच आजही येथे बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या नाइटलाइफविरोधात कोणीच ब्रसुद्धा उच्चारत नव्हते.
मुंबई : मुंबईतल्या नाइटलाइफवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले असतानाच आजही येथे बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या नाइटलाइफविरोधात कोणीच ब्रसुद्धा उच्चारत नव्हते. नेमका हाच धागा पकडत ‘लोकमत टीम’ने ‘रिअॅलिटी चेक’मधून रात्रजीवनावर प्रकाश टाकत वस्तुस्थिती मांडली. वृत्तातील या वस्तुस्थितीचे हॉटेल इंडस्ट्रीनेही स्वागत केले आणि कायदा मोडून, नियमांचे उल्लंघन करून रात्री-अपरात्रीपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवणे अयोग्यच असल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’कडे नोंदविली.
युवासेनेने नाइटलाइफचा मुद्दा मांडला आणि त्यावर चोहोबाजूंनी टीका झाली. नाइटलाइफ पाहिजेही आणि नकोही, असे दोन गट पडले. राज्य सरकारने नाइटलाइफ सुरू करण्याबाबत विचारविनियम सुरू केला. मात्र सुरक्षेच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने सरकारला खडसावले. तोवर राजकारण झालेल्या नाइटलाइफवर प्रकाशझोत टाकत ‘लोकमत’ने हॉटेल इंडस्ट्रीजच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
आहार संघटनेचे सचिव सुकेश शेट्टी यांनी सांगितले की, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार हे विनापरवाना जर रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असतील, तर ते चुकीचेच आहे. कायदा सर्वांना सारखाच आहे. दक्षिण मुंबईचा तुम्ही उल्लेख करीत असाल तर तेथे काही फूड स्टॉल आहेत आणि ते आमचे सदस्य आहेत की नाही, हे पहिल्यांदा तपासून घ्यावे लागेल. उरला मुद्दा संघटनेच्या सदस्यांनी कायदा आणि नियम पाळण्याबाबतचा, तर आम्ही नेहमीच त्यांचे याबाबत कान टोचत असतो. दी फेडरेशन आॅफ हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ इंडियाचे माजी अध्यक्ष कमलेश बारोट यांनी याबाबत सांगितले की, नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू राहत असतील तर अयोग्यच आहे. या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. मात्र दुसरी बाजू पाहिली तर आपण मुंबईची आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहरांशी तुलना करतो. अशा वेळी येथे येणाऱ्या पर्यटकांचा विचार करता, भविष्याचा विचार करता आणि मेगा सिटीचा विचार करता ज्यांना खरंच या गोष्टींची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी नाइटलाइफचा विचार करावाच लागेल.
दिशा हॉटेलर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश शेट्टी यांनी सांगितले की, दक्षिण आणि मध्य मुंबईतच नाही तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांत रात्री-अपरात्री हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू असतात. ते एखाद्या हॉटेलर्स असोसिएशनचे सदस्य असले तरी अंतर्गत वादामुळे या मुद्द्यावर त्यांचे कान टोचता येत नाहीत. शिवाय स्थानिक पोलीस ठाणे आणि संबंधित विक्रेत्यांचे लागेबांधे असतात. परिणामी या गोष्टींना आवर घालता येत नाही. आणि दुसरीकडे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारने याविरोधात कारवाई करणे गरजेचे असते; परंतु ती कारवाई होत नाही. (प्रतिनिधी)
नाइटलाइफ अधिकृत नकोच. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बारमधील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात आता कुठे पोलिसांना यश आले आहे. आणि रात्री-अपरात्री बार सुरू असलेल्या ठिकाणी काही ना काही अनुचित प्रकार घडतच असतो. त्यामुळे याला अधिकृत परवानगी मिळाल्यास गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे.
- राज जाधव, अॅड मेकर
कधीही न झोपणारे शहर अशी मुंबईची ओळख आहे. दुकाने सुरू ठेवण्यासाठी प्रशासकीय नियम आहेत. परंतु हे नियम धाब्यावर बसवून मुंबई रात्रभर सुरू असते. त्यामुळे मुंबईत रात्री कोणत्याही ठिकाणी खाण्या-पिण्याची सोय होते. कोणतेही सरकार येवो किंवा अधिकारी सध्या सुरू असलेले नाइटलाइफ कधीच बदलणार नाही. नाइटलाइफला अधिकृत मान्यता दिल्यास मुंबईची सुरक्षा व्यवस्था धोक्यात येईल. त्यामुळे सर्व स्तरातून नाइटलाइफला विरोध झालाच पाहिजे. - प्रदीप चव्हाण, समाजसेवक
मुंबई कधी न झोपणारे शहर असे म्हटले जाते. मुंबई ही कष्टकऱ्यांची असल्यामुळे मुंबई झोपत नाही. आता मुंबईचा दर्जा उंचावण्यासाठी नाइटलाइफ सुरू करणे हे योग्य नाही. रात्रभर खाण्यास पिण्यास मिळाले म्हणजे दर्जा उंचावला असे होत नाही. मुंबईत अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा नाहीत. अनेक ठिकाणी मुंबईकर सुरक्षित नाहीत. त्यांना एकटे जाण्यास भीती वाटते. नाइटलाइफ सुरू झाल्यास अजून प्रश्न उद्भवतील. म्हणून नाइटलाइफ नको. - नेहा भावे, एचआर
नाइटलाइफ सुरू झाले तर सुरक्षेचा मुद्दा सर्वात ऐरणीवर आहे. शिवाय महिला सुरक्षेचाही विषय आहे. नाही तरी उच्च न्यायालयाने या मुद्द्यावरून राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेतच. आणि सर्वसामान्य माणसाला, कष्टकरी मुंबईकराला नाइटलाइफची चैन परवडणारी नाही हेही ध्यानात घेतले पाहिजे.
- सुगंधी फ्रान्सिस, सामाजिक कार्यकर्त्या