Join us

राज्यात गर्भपाताच्या औषधांची अवैध विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:06 AM

मुंबई : गर्भपातासाठी वापरात येणाऱ्या औषधांचा गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधांची खरेदी-विक्री विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि ...

मुंबई : गर्भपातासाठी वापरात येणाऱ्या औषधांचा गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधांची खरेदी-विक्री विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि गर्भपात करणाऱ्या रुग्णालयांवर अन्न व औषध प्रशासनाने अचानक तपासणी मोहीम राबविली. यात राज्यभरातील एकूण ३८४ संस्थांची तपासणी केली असून, राज्यभरात १४ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

या तपासणीत काही किरकोळ विक्रेते गर्भपातासाठी लागणारी औषधे, एमटीपी किट अवैधरीत्या प्राप्त करून घेत असल्याचे दिसून आले, तसेच काही विक्रेते चढ्या दराने विक्री करत असल्याचेही समोर आले. त्या अनुषंगाने बनावट ग्राहक पाठवून संबंधित किरकोळ विक्रेत्यांना अवैधरीत्या प्राप्त केलेले व चढ्या दराने, विनाप्रिस्क्रिप्शनने, विनाबिलाने गर्भपाताची औषधे विकताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ४७ हजार ३७८ किमतीची औषधे जप्त करण्यात आलेली आहेत. या विक्रेत्यांविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली, अशा स्वरूपाच्या एकूण १३ किरकोळ विक्रेत्यांविरोधात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या विभागांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये नोंदविण्यात आलेल्या १४ गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत एकूण ११ व्यक्तींना अटक करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे. ज्या किरकोळ व ठोक औषध विक्रेत्यांच्या तपासण्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, अशा ४२ विक्रेत्यांविरुद्ध कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सर्व औषध विक्रेत्यांना आवाहन करण्यात येते की, गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांची परवानाधारक संस्थेकडून खरेदी करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच औषध विक्री करण्यात यावी, तसेच जनतेने गर्भपातासाठी लागणारी औषधे अवैधमार्गाने प्राप्त करून घेण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.

मुंबईच्या रुग्णालयातील डॉक्टरवर गुन्हा दाखल

मुंबईमधील पश्चिम उपनगरातील एका रुग्णालयाच्या डॉक्टरविरोधात गर्भपातासाठी वापरलेल्या औषधांची माहिती न दिल्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.