गिरणी कामगारांच्या घरांची बेकायदा विक्री, घरांचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 02:00 AM2017-10-30T02:00:40+5:302017-10-30T02:00:54+5:30

म्हाडाने गिरणी कामगारांसाठी परवडणाºया दरात घरे उपलब्ध करून दिली असून, या घरांची परस्पर विक्री करणे शक्य नाही. मात्र, तरीही गिरणी कामगारांच्या घरांची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

Illegal sale of mill workers' houses; | गिरणी कामगारांच्या घरांची बेकायदा विक्री, घरांचा प्रश्न ऐरणीवर

गिरणी कामगारांच्या घरांची बेकायदा विक्री, घरांचा प्रश्न ऐरणीवर

googlenewsNext

अक्षय चोरगे
मुंबई : म्हाडाने गिरणी कामगारांसाठी परवडणाºया दरात घरे उपलब्ध करून दिली असून, या घरांची परस्पर विक्री करणे शक्य नाही. मात्र, तरीही गिरणी कामगारांच्या घरांची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गिरणी कामगारांना लॉटरीत मिळालेल्या म्हाडाच्या घरांची विक्री तब्बल ३० ते ७० लाख रुपयांना केली जात असल्याचे समोर आले आहे. परिणामी, म्हाडाकडून याबाबत लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, गिरणी कामगारांच्या घरांची विक्री होत असल्याच्या तक्रारी, गिरणी कामगार व गिरणी कामगार संघटनांतर्फे म्हाडाकडे आल्या आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ज्या गिरणी कामगारांना लॉटरीमार्फत घरे मिळाली आहेत, त्यापैकी ६० टक्क्यांहून अधिक गिरणी कामगार हे मुंबईत राहात नाहीत. त्यामुळे घर विकण्याचा प्रयत्न ते करीत आहेत, परंतु म्हाडाची घरे १० वर्षांपर्यंत विकता येत नाहीत. मात्र, ती भाड्याने देण्याची मुभा म्हाडाने दिली आहे. अशा वेळी गिरणी कामगार घर विकत आहेत. बहुतांश गिरणी कामगारांनी बँकामधून कर्ज काढून घरे खरेदी केलेली आहेत. कर्जाचे हप्ते फेडण्यास आर्थिक मदत मिळावी, याकरिता ही घरे भाड्याने देण्याचा अधिकार म्हाडाने गिरणी कामगारांना दिला आहे. मात्र, तरीही काही गिरणी कामगारांनी म्हाडाच्या लॉटरीत लागलेली घरे विकण्याचा घाट घातला आहे.

घरे विकण्याची कारणे
गिरणी कामगारांना मिळालेल्या घरांमध्ये पुरेशा सोईसुविधा नाहीत, त्यामुळे गिरणी कामगार घरे विकतात.
बहुतांश गिरणी कामगार मुंबईत राहात नसल्यामुळे, मुंबईतील घर विकून सध्या राहत असलेल्या ठिकाणी घर खरेदी करावे अथवा पैसे गुंतवावे, या हेतूने घर विकले जाते.
बहुतांश गिरणी कामगारांची सध्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने घरांची विक्री केली जात आहे, तसेच घरखरेदी करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी घर विकण्याचा घाट घातला जातो.
घर भाड्याने देण्याचा अधिकार असल्यामुळे कर्जाचे हप्ते फेडणे सोईस्कर होते, परंतु भाडेकरू मिळाला नाही, तर दोन-तीन महिने घर भाडेकरूविना तसेच पडून राहाते. त्यामुळे एका वेळी तीन-चार हप्ते भरणे अवघड होते. अशा वेळी घर विकण्याचा प्रयत्न केला जातो.


गिरणी कामगारांना घर मिळावे, यासाठी गिरणी कामगारांच्या अनेक संघटना कार्यरत आहेत. त्यांच्या मागील २५ वर्षांच्या लढ्यामुळेच गिरणी कामगारांना घरे मिळत आहेत, परंतु मिळालेली घरे गिरणी कामगारांनी विकू नयेत, यासाठी गिरणी कामगार आणि गिरणी कामगार संघटना प्रयत्न करत आहेत.
बँकांचे हप्ते थकलेले असल्यामुळे, जे कामगार घर विकण्याचा प्रयत्न करतात, त्या बँकातील अधिकाºयांशी बोलून हप्ते पुढे ढकलणे, सवलत देणे, तत्काळ बँकेकडून मदत मिळविणे, त्यांच्या घरांमध्ये भाडेकरू मिळवून देणे, अशी कामे संघटनांकडून होत आहेत, परंतु हे प्रयत्न कमी पडत आहे, असे मुंबई गिरणी कामगार फेडरेशनकडून सांगण्यात आले आहे.

विक्री होते कशी?
घरे १० वर्षांसाठी भाड्याने दिल्याचे कायदेशीर कागदपत्रे तयार केली जातात, परंतु घरखरेदी करणारी व्यक्ती घरांची पूर्ण किंमत गिरणी कामगाराला देते. दहा वर्षांनी ते घर खरेदी करणाºयाच्या नावावर होते. घर विकताना गिरणी कामगार व त्याच्या सर्व कुटुंबीयांच्या संमतीने व्यवहार होत असल्याने, त्यांच्याही स्वाक्षºया घेतल्या जातात.

देखभाल खर्च न झेपणारा
इमारतींपासून ते मोठ्या टॉवरमध्ये विविध प्रकारची घरे गिरणी कामगारांना म्हाडाच्या लॉटरीत मिळाली आहेत, परंतु इमारती किंवा टॉवरमधील घरांचा देखभाल खर्च दोन ते पाच हजार रुपये आहे. हा खर्च झेपणारा नसल्याने, त्या घरांमध्ये राहणे गिरणी कामगार टाळतात. त्यामुळे ही घरे गिरणी कामगार भाड्याने देतात अथवा त्याची विक्री करतात.

दलालांचा सुळसुळाट
गिरणी कामगारांना लॉटरीमध्ये घरे लागल्यानंतर म्हाडाच्या कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. गिरणी कामगारांना मोठ्या टॉवरमध्ये, इमारतींमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये घरे मिळाली आहेत. या घरांची बाजारात किंमत ३० लाखांपासून ते ६० लाखांपर्यंत असल्यामुळे, ७ ते १२ लाख रुपयांमध्ये मिळालेल्या घरांसाठी २५ लाखांहून अधिक रुपये मिळत आहेत.

एकीएकडे हक्काचे घर मिळावे, म्हणून गिरणी कामगार व संघटना मागील २५ वर्षांपासून संघर्ष करत असताना, दुसरीकडे मिळालेली घरे विकण्याचे धाडस गिरणी कामगारांनी दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गिरणी कामगार मिळालेल्या घरांची विक्री करत असल्याच्या अनेक तक्रारी म्हाडाकडे आल्या आहेत. त्यामुळे म्हाडाकडून याची चौकशी केली जाणार आहे.

ज्या घरांचा गिरणी कामगारांना ताबा देण्यात आला आहे, अशा घरांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या घरांमध्ये कोण राहात आहे, किती महिन्यांच्या करारावर राहात आहेत, किती रुपये भाडे दिले जाते? जे गिरणी कामगार मिळालेल्या घरात स्वत: राहात आहेत, त्यांचीही भेट घेतली जाणार आहे.

गिरणी कामगारांनी घरे विकू नयेत, म्हणून आमच्या फेडरेशनकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गिरणी कामगारांना त्यासाठी मार्गदर्शन करत आहोत. मदत मिळवून देण्याचा प्रयत्नही केला जात आहेत, परंतु तरीही काही गिरणी कामगार घरे विकत आहेत. त्याबाबत म्हाडाकडे तक्रार केली आहे. म्हाडाकडून यावर अ‍ॅक्शन घेतली जाईल, असे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.
- बाबा कदम, कार्याध्यक्ष, मुंबई गिरणी कामगार फेडरेशन

गिरण्या बंद पडल्यापासूनच गिरणी कामगार हा कर्जबाजारी आहे. त्यामुळे या कामगारांसमोरील आर्थिक अडचणी सोडविण्यास ते घर विकण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला असा एकही गिरणी कामगार सापडला नाही, ज्याने घर विकले आहे, परंतु गिरणी कामगार घर विकत असल्याची माहिती कानावर येते. त्यामुळे नेहमीच आम्ही गिरणी कामगारांना मार्गदर्शन करत असतो. काही दलाल गिरणी कामगारांना घर विकण्याचे आमिष दाखवितात. त्यामुळे या दलालांवर कारवाई करण्याची म्हाडाकडे विनंती केली आहे. - काशिनाथ माटल, प्रसिद्धी प्रमुख, राष्टÑीय मिल मजदूर संघ

लॉटरीत घरे लागलेल्या गिरणी कामगारांनी घरे विकली असतील, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणे आवश्यक आहे. अशी घरे गरजू गिरणी कामगारांना द्यायला हवीत. घरांच्या किमती काही गिरणी कामगारांना परवडणाºया नाहीत, तर काही ठिकाणी टॉवरमधील घरांची देखभाल परवडणारी नसल्याने, गिरणी कामगारांनी ती घरे विकण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु अशा गिरणी कामगारांसाठी घर भाड्याने देण्याचा पर्याय म्हाडाने उपलब्ध केला आहे. त्यामुळे त्याचा कामगारांनी योग्य फायदा घ्यायला हवा.
- दत्ता इस्वलकर, अध्यक्ष, गिरणी कामगार संघर्ष समिती

काही गिरणी कामगारांनी घरे विकली आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल. त्यासाठी म्हाडाकडून सर्वेक्षण करण्यात येणार असून, घरांचा ताबा दिलेल्या घरांना भेट देऊन तेथे कोण राहात आहेत? गिरणी कामगाराव्यतिरिक्त राहणारे कुटुंब भाडेतत्त्वावर राहात आहेत का? याबाबत माहिती मिळविली जाणार आहे. काही गिरणी कामगार घर भाड्यावर असल्याचे दाखवितात. त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळावी, या हेतूने त्यांच्यासाठी मुंबईत घरे बांधली, परंतु ती घरे परस्पर विकली गेल्याने उद्देशाला गालबोट लागत आहे.
- सचिन अहिर, अध्यक्ष, राष्ट्रीय मिल मजदूर संघ

Web Title: Illegal sale of mill workers' houses;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.