बेकायदेशीर सलून, पार्लरचा सुळसुळाट!
By admin | Published: May 29, 2017 06:59 AM2017-05-29T06:59:50+5:302017-05-29T06:59:50+5:30
गुमास्ता कायद्याची पायमल्ली, हीच धंद्यातील सर्वात मोठी अडचण आहे. गुमास्ता कायद्याप्रमाणे दर सोमवारी धंदा बंद ठेवणे
सलून व ब्युटी पार्लर धंद्यामधील सर्वात मोठी अडचण कोणती?
गुमास्ता कायद्याची पायमल्ली, हीच धंद्यातील सर्वात मोठी अडचण आहे. गुमास्ता कायद्याप्रमाणे दर सोमवारी धंदा बंद ठेवणे क्रमप्राप्त आहे. मात्र, बहुतेक सलून आणि ब्युटी पार्लर सोमवारीही खुले ठेवले जातात. त्यामुळे कामगारांचे शारीरिक आणि आर्थिक शोषण होते. दररोज १० तासांहून अधिक काम करवून घेता येत नाही, तरी नामांकित सलूनमध्ये कामगारांकडून १२ तासांहून अधिक वेळ काम करवून घेतले जाते. आठवडाभर काम केल्याने कामगारांचे शारीरिक स्वास्थ्यही बिघडते, शिवाय प्रामाणिकपणे सोमवारी दुकाने बंद ठेवणाऱ्या सलूनचे नुकसान होते.
प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे?
महापालिका प्रशासनाने विनापरवाना सलून व ब्युटी पार्लरची झाडाझडती घ्यावी. काही सलूनवर कारवाई झाल्यावर आपसूकच सर्व ब्युटी पार्लर व सलून मालक परवाना घेण्यासाठी रांगा लावतील. संघटनेच्या सर्वेक्षणानुसार सुमारे ७० टक्के ब्युटी पार्लर व सलूनकडे पालिकेचा गुमास्ता परवानाच नाही. या धंद्यात पालिकेच्या आरोग्य विभागाचा परवाना सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. मात्र, सद्यस्थितीत ९० टक्के सलून मालकांकडून हा परवानाच घेतलेला नसल्याचे संघटनेला कळले आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल तर बुडत आहेच. मात्र, ग्राहकांच्या जिवाचा खेळ सुरू आहे.
महापालिका कर्मचारी कामचुकारपणा करत आहेत का?
होय. प्रत्येक सलूनमध्ये एक रजिस्टर ठेवणे बंधनकारक असून, त्यात महापालिका अधिकाऱ्याने सलूनला भेट दिल्यानंतर सूचना, हरकती लिहून सही करणे आवश्यक असते. आजही बहुतेक सलूनमधील रजिस्टर कोरी दिसून येतील. मनुष्यबळाचा तुडवडा समजू शकतो. मात्र, याचा अर्थ सलूनला भेटी द्यायच्याच नाहीत, हे सर्वस्वी चुकीचे आहे.
२४ तास दुकाने खुली ठेवण्याच्या निर्णयाकडे कशा प्रकारे पाहता?
मुळात या नियमाबाबत स्पष्टता नाही. केवळ एका वर्षाच्या धर्तीवर महापालिकेने प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या या नियमाला १ जानेवारी २०१७ रोजीच वर्षपूर्ती झाली आहे. त्यानंतर, या नियमाला मुदतवाढ मिळालेली नाही, त्यामुळे दुकानदारांनी नेमके काय करावे? याबाबत संभ्रम आहे. महापालिका अधिकारीही याबाबत निरुत्तर ठरत आहेत.
संघटनेकडून व्यवसाय वृद्धीसाठी काही प्रयत्न सुरू आहेत का?
होय. राज्यातील ग्रामीण भागात संघटनेकडून शिबिरे घेण्यात येत आहेत. व्यवसायातील आधुनिक पद्धतींसोबतच ग्राहकांना भुरळ घालणे, टापटीपपणा अशा सर्वच बाबतीत नामांकित हेअर स्टाईलिस्टकडून मार्गदर्शन दिले जाते. गेल्या दशकभरात या व्यवसायाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन बदलला आहे, त्याबाबत माहिती देताना अधिकाधिक तरुणांनी व्यवसायात उतरण्याचे आवाहन शिबिरांतून केले जाते. मात्र, १० तास उभे राहून काम करण्याची बहुतेक तरुणांची मानसिकता नसते. त्यामुळे या व्यवसायातील अर्थकारण समजून देताना मिळणारी प्रतिष्ठाही समजवण्याचा संघटनेचा मानस असतो.