Join us

महालक्ष्मी रेसकोर्सवर अवैधरीत्या सट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 5:50 AM

महालक्ष्मी रेसकोर्स येथे घोडे शर्यतीवर अवैधरीत्या सट्टा लावणाऱ्या ११ जणांना गुन्हे शाखेच्या कक्ष २ ने बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्स येथे घोडे शर्यतीवर अवैधरीत्या सट्टा लावणाऱ्या ११ जणांना गुन्हे शाखेच्या कक्ष २ ने बेड्या ठोकल्या आहेत.रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबतर्फे रेसकोर्सवर दोन दिवसांपासून शर्यत सुरू होती. क्लबची परवानगी न घेता या शर्यतीवर परस्पर सट्टेबाजी सुरू होती. याबाबत गुन्हे शाखेच्या कक्ष २ ला माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून कारवाई केली. चेतन धर्मा सोलंकी, ईलियाज युसुफ गलियारा, हमझास शापुर्जी दाजी, प्रशांत जोगदीया, परेश शाह, संदीप यादव, संदीप शिर्के, अफजलाली नवाबअली, ब्रियेन मकवान, राजेश अगरवाल, मोहम्मद सरवार अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ४ मोबाइल फोन आणि रोकड जप्त केली आहे.त्यांनी या सट्ट्यातून ९२ हजार १० रुपये मोबाइल फोनद्वारे मागितल्याचे नोंदीतून स्पष्ट झाले. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत दलालांकरवी सट्टा लावल्यास २८ टक्के वस्तू सेवा कर भरावा लागतो. सट्टा जिंकल्यास कराची रक्कम कापून पैसे दिले जातात. परस्पर सट्टा स्वीकारल्यास कर चुकविला जातो. त्यासाठीच आरोपींची लपून सट्टेबाजी सुरू असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.