लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भिवंडीपाठोपाठ मुंबईतील गोवंडीच्या शिवाजीनगर भागातही बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंजवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी रात्री धाड टाकून या प्रकरणी विपूल टंडन (रा. डोंबिवली) याला अटक केली. त्याच्याकडूनही दोन मशिन आणि ६४ सिम कार्ड असा दोन लाख ५५ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने १७ मे रोजी भिवंडीतील चार वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून सुफियान अन्सारी, इकबाल सुलेमान, मो. अस्लम शेख, युनुस हाज्मी आणि समीर अलवारी या पाच जणांना अटक केली होती. त्यांच्याकडील चौकशीत गोवंडीत आणखी एक समांतर बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाली. तिच्या आधारे साहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राऊत यांच्यासह साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सानप, संदीप निगडे, हवालदार रवी पाटील आणि प्रकाश पाटील यांच्या पथकाने १८ मे रोजी रात्री शिवाजीनगर भागात छापा टाकून हे समांतर बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज सील केले. दोन मशिन, सिम बॉक्स आणि रिलायन्स कंपनीचे ६४ सिम आणि एक लॅपटॉप अशी सामग्री या कारवाईत जप्त केली. भिवंडीप्रमाणेच या ठिकाणीही परदेशातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉलसाठी अनधिकृत सिम बॉक्सचा वापर करून त्यामध्ये भारतीय कंपनीचे सिम कार्ड्स वापरून भारतातील इच्छित मोबाइल क्रमांकावर कॉल केले जात होते. या प्रकरणी आणखी टोळी कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी भारतीय पुरावा कायदा, टेलिग्राफ कायदा तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतही बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज
By admin | Published: May 20, 2017 1:50 AM