Join us

अवैध वाहतूक उठली जीवावर, त्यांना लगाम कधी लागणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 12:38 PM

दंड आकारूनही वाहन चालक-मालक सुधारेनात

मुंबई :  मुंबई शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणावर अवैध मालवाहतूक होतेय. क्षमतेपेक्षा अधिक माल भरून वाहतूक केल्याने अनेकदा अपघातही घडत असून ही वाहतूक जीवावरही बेतत आहे. अलीकडेच एका ट्रकमधून पाइप पडल्याने एक दुचाकीस्वार जखमी होण्याची आणि एका चारचाकीचे नुकसान होण्याची घटना घडली होती. अवैध मालवाहतुकीला रोख लावण्यासाठी आरटीओ विभागाने वर्षभरात हाती घेतलेल्या मोहिमेतून सुमारे कोट्यवधी रुपयांचा महसूल दंडाच्या रुपात गोळा झाला आहे. अंधेरी, वडाळा, ताडदेव आणि बोरिवली येथील चार  आरटीओंनी स्वतंत्रपणे केलेल्या कारवाईत दंड आकारण्यात आला. तरीही चालक-मालक सुधारत नसल्याचेच चित्र आहे.

क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्यांमध्ये खासगी बसेससह मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचाही समावेश असतो. मालवाहतुकीत रेती, सिमेंट, विटा अशा बांधकाम व्यवसायाशी संबंधित ओव्हरलोडचे प्रमाण सर्वाधिक आढळते. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता सर्वाधिक असून शहरांपेक्षा ग्रामीण भागात त्याची तीव्रता जास्त असते.

अवैध मालवाहतुकीत बहुतांश माल जास्त असल्याने वेगाने धावणाऱ्या गाडीतून माल किंवा गठ्ठा खाली किंवा दुचाकीस्वाराच्या अंगावर पडून गंभीर दुखापत होण्याचाही धोका आहे. त्या मालवाहू वाहनाने अर्जंट ब्रेक दाबल्यानेही तो माल खाली कोसळून जीवितहानीचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळेच नियमाकडे दुर्लक्ष करून होणारी अवैध मालवाहतूक त्वरित रोखणे गरजेचे आहे.

खासगी बसमधूनही होते अवैध वाहतूकअशा माल वाहतुकीमधून पूर्वी जकातीची आणि आता एलबीटीची चोरी केली जाते. त्यातून महापालिकेचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असूनदेखील त्याकडे पालिकेच्या यंत्रणेकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. काही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तर या कामासाठी स्वतंत्र गुदामेच उभारली आहेत. ही गुदामे महामार्गालगतच्या जागांवरच असून, तिथूनच माल लक्झरीवर चढवला आणि उतरवला जातो. तरीही कोणी त्याला आक्षेप घेत नाही.

वाहतूकदारांनी सर्वाधिक प्राधान्य प्रवाशांच्या सुरक्षेला द्यायला हवे.बसमधून व्यावसायिक माल वाहतूक करण्यास बंदी आहे.प्रवाशांच्या सामान वाहतूकची परवानगी आहे. नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. या जुन अखेरपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे.विनय अहिरे, प्रवक्ता ,परिवहन विभाग

टॅग्स :मुंबई