संपकाळात बेकायदा डिझेलची चोरटी वाहतूक, भरारी पथकाने जप्त केले १० टँकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 02:42 PM2024-01-04T14:42:57+5:302024-01-04T14:43:32+5:30
अलिबागच्या समुद्रातील बोटीतून डिझेल भरून काही टँकर मुंबई-गोवा महामार्गावरील तरणखोप, पेण येथे असलेल्या शुभलक्ष्मी हॉटेलजवळ पार्क करण्यात आल्याची माहिती पोलिसांना १ जानेवारी रोजी मिळाली होती.
मुंबई : देशभरात टँकरचालकांनी केलेल्या संपामुळे गेले दोन दिवस वाहनचालकांचे डिझेल, पेट्रोलचे वांधे झाले असतानाच रायगडच्या पेणमध्ये होणारी डिझेलची चोरटी वाहतूक सरकारच्या दक्षता भरारी पथकाने उघडकीस आणली आहे. पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत डिझेलने भरलेले १० टँकर असा १ कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, तस्करी करणाऱ्यांविरोधात पेण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
अलिबागच्या समुद्रातील बोटीतून डिझेल भरून काही टँकर मुंबई-गोवा महामार्गावरील तरणखोप, पेण येथे असलेल्या शुभलक्ष्मी हॉटेलजवळ पार्क करण्यात आल्याची माहिती पोलिसांना १ जानेवारी रोजी मिळाली होती. नागरी पुरवठा विभागाच्या दक्षता पथकाने या ठिकाणी पोलिसांसमवेत धाड टाकली असता टँकरमधून चोरी छुप्या पद्धतीने डिझेलची वाहतूक केल्याचे अधिकाऱ्यांना निदर्शनास आले.
त्या ठिकाणी पार्क केलेल्या काही टँकरमधून जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत तरतुदींचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी कारवाई करून डिझेलने भरलेले १० टँकर ताब्यात घेतले. तसेच वाहतूक करणाऱ्या टँकर मालक व चालकांसह ९ जणांविरोधात पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे.