मुंबई : रस्त्याच्या कडेला केली जाणारी अवैध पार्किंग पालिकेची डोकेदुखी ठरत आहे. मुंबईतील रस्त्यांच्या कडेला उभी केली जाणारी वाहने ही पालिकेच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेत अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी पालिका अधिकारी करीत आहेत. यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याची विनंती त्यांनी वाहतूक उपायुक्तांना केली असून, अशी अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाईची विनंती केली आहे.
स्वच्छ मुंबईसाठी आणि मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी पालिकेने सर्व वॉर्डात ‘डीप क्लिनिंग’ सुरू केली आहे. यामध्ये ब्रश आणि यंत्रांच्या साहाय्याने रस्ते स्वच्छ करून ते पाण्याने धुतले जात आहेत. आवश्यक तेथे स्मॉग गनच्या साहाय्याने हवेतील धूलिकण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला . पालिकेच्या एम पूर्व विभागामध्ये शिवाजीनगर, देवनार, गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे पैजूर अशा परिसरात बऱ्याच ठिकाणी वाहनांची पार्कींग दिवस-रात्र असल्याने पालिकेकडून रोज करण्यात येणाऱ्या साफसफाईच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी पालिका अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणारी साफसफाई गुणात्मक पद्धतीने दिसून येत नाही व महानगरपालिकेची प्रतिमा मलिन होते असा आरोपच पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.
एम पूर्व परिसराच्या सहायक आयुक्तांनी पूर्व उपनगरच्या वाहतूक पोलिस उपायुक्तांना पत्र लिहिले असून, तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
येथे होतीय अवैध पार्किंगमुळे कोंडी -
घाटकोपर, मानखुर्द लिंक रोड, शिवाजी नगर अहिल्याबाई होळकर मार्ग, शिवाजी नगर बाजीप्रभू देशपांडे मार्ग, शिवाजी नगर ९० फीट रोड, शिवाजी नगर वामन तुकाराम पाटील मागे, गोवंडी पूर्व