मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतून परीक्षा दिलेल्या १२ हजार २३८ निरक्षरांपैकी ११ हजार ८८० परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल ९७.०७ टक्के इतका आहे. राज्याचा सरासरी निकाल ९२.६८ टक्के असताना मुंबईतील निरक्षरांनी दमदार कामगिरी केली आहे.
नवभारत साक्षरता अभियानांतर्गत १७ मार्चला मुंबईत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी घेण्यात आली होती. त्यात मुंबईतून परीक्षा दिलेल्या परीक्षार्थींपैकी अवघ्या ३५८ परीक्षार्थींना सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आता त्यांना सप्टेंबर किंवा मार्च २०२५ मध्ये फेरपरीक्षा देऊन साक्षरांच्या यादीत आपले नाव नोंदवता येईल.
राज्यभरात सहा लाख ४१ हजार निरक्षरांची नोंदणी झाली होती. त्यापैकी चार लाख ५९ हजार ५३३ निरक्षरांनी परीक्षा दिली. त्यात चार लाख २५ हजार ९०६ निरक्षर उत्तीर्ण झाले आहेत, तर ३३ हजार ६२७ निरक्षरांना सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
१) मुंबईत तब्बल २० हजार निरक्षरांची नोंदणी करण्यात यश आले होते.
२) त्यापैकी १६ हजार २९२ निरक्षर चाचणीला सामोरे जाणार होते.
३) प्रत्यक्षात १२ हजार २३८ जणांनीच परीक्षा दिली होती.
काय आहे नवभारत साक्षरता अभियान?
केंद्र सरकारच्या उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटांतील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करण्याची योजना आहे. त्यानुसार हे साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.
मुंबईतून साक्षरता अभियान उत्तीर्ण झालेल्या पुरुषांची संख्या अवघी दोन हजार ५१२ आहे. महिलांची संख्या साधारण चारपट म्हणजे नऊ हजार ३६८ इतकी आहे.
परीक्षेचे स्वरूप-
प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली होती. परीक्षा एकूण १५० गुणांची होती. अनुक्रमे भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख (लेखन) ५० गुण, भाग-ग (संख्याज्ञान) ५० गुण असे होते. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण) अनिवार्य होते. व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य होते.