सामाजिक एकोप्याचे मूर्तिमंत उदाहरण

By admin | Published: January 29, 2016 02:58 AM2016-01-29T02:58:57+5:302016-01-29T02:58:57+5:30

मुंबईतील बीडीडी चाळींमध्ये शिवडी बीडीडीला वेगळेच स्थान आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त ५ एकर २८ गुंठे जमिनीवर वसलेल्या या वसाहतीमध्ये तळ अधिक तीन

An illustrative example of social equality | सामाजिक एकोप्याचे मूर्तिमंत उदाहरण

सामाजिक एकोप्याचे मूर्तिमंत उदाहरण

Next

- चेतन ननावरे,  मुंबई
मुंबईतील बीडीडी चाळींमध्ये शिवडी बीडीडीला वेगळेच स्थान आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त ५ एकर २८ गुंठे जमिनीवर वसलेल्या या वसाहतीमध्ये तळ अधिक तीन मजल्याच्या एकूण १२ इमारती आहेत. त्यात ९६० भाडेकरू राहत असून येथील लोकसंख्या ५ हजारांवर आहे. सर्व धर्माचे लोक याठिकाणी गुण्यागोविंदाने राहत असून हिंदू आणि मुस्लिम धर्मिय रहिवाशांची संख्या अधिक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे १९९३ च्या दंगलीत मुंबई पेटली असतानाही येथील रहिवाशांनी अतिशय संयमाने परिस्थितीला तोंड दिले.
शिवडी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला अगदी स्थानकालगतच बीडीडी वसाहत आहे. हाकेच्या अंतरावर असलेले सुकट मार्केट, रफी अहमद किडवाई मार्गावरील कपडा मार्केट, इंग्रजी माध्यम शाळा, केईएम व वाडिया रूग्णालये यामुळे येथील रहिवासी दुसऱ्या जागी जाण्याचा विचारही करू शकत नाहीत.
महत्त्वाची बाब म्हणजे एकही रुपया वर्गणी न काढता वसाहतीमधील प्रश्नांसाठी शिवडी बीडीडी चाळ रहिवाशी संघ सातत्याने लढा देत आहे. वसाहतीचा संपूर्ण कारभार चालवण्याचे काम संघ करतो. कुणाच्याही घरात काहीही नुकसान झाल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ते काम करून घेण्यासाठी संघाचे पदाधिकारी पाठपुरावा करतात, अशी माहिती संघाचे सरचिटणीस दिनेश (भाई) राऊळ यांनी दिली. संघ आर्थिक मदत करत नसला, तरी प्रशासनाकडून मिळेल ती मदत मिळवून देण्याचे काम करत असल्याचे राऊळ सांगतात.
वसाहतीमध्ये गणेशोत्सव आणि ईद सारख्याच धूमधडाक्यात होते, असे संघाचे कार्याध्यक्ष मानसिंग राणे यांनी सांगितले. ते म्हणाले की, सामाजिक एकतेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे येथील अखिल शिवडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होय. बीडीडी चाळ क्रमांक ९च्या पटांगणात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळाचे चिटणीस मोईद्दीन खान आहेत. गणपती आगमनापासून गणेश विसर्जनापर्यंतची सर्व कामे येथील मुस्लीम बांधव मोठ्या उत्साहात करतात. संबोधी सामाजिक मंडळा १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते. त्यातही हिंदू आणि मुस्लिम कार्यकर्ते आत्मियतेने भाग घेतात. बकरी ईद असो वा रमजान इमारत क्रमांक १२ व १४ मध्ये नमाज पठण करताना हिंदू आणि बौद्ध रहिवासीही सहभागी होतात, असे राणे यांनी सांगितले.

सामंजस्याने मैदानाचा वापर
विविध धर्मांचे लोक राहत असल्याने मैदानाच्या वापरावरून भांडण होण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे संघाने पुढाकार घेऊन सामंजस्याने प्रत्येक जाती धर्माच्या आणि प्रत्येक इमारतींमधील रहिवाशांना मैदानाचा वापर करता येईल, असे नियोजन केले आहे. त्यामुळे येथील मैदानात लग्न कार्यापासून क्रीडा सामने, नमाज पठण असे सर्वच कार्यक्रम गुण्यागोविंदाने पार पडतात. शिवाय मैदानाची निगाही स्थानिकच राखतात.

स्वच्छतेसाठी असाही लढा
वसाहतीमध्ये कचराकुंडी नसल्याने अस्वच्छता पसरली होती. पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही मदत मिळत नव्हती. संघाने अस्वच्छतेचे फोटो काढून पालिका प्रशासनाला पाठवले. त्यानंतर पालिकेने कचरा संकलनासाठी ४ कचराकुंड्यांची व्यवस्था केली, असे संघाचे उपाध्यक्ष मारूती कदम यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींवर
संघाचा दबाव
वसाहतीचा कारभार पाहणाऱ्या भाडेकरू संघाचा येथील लोकप्रतिनिधींवर चांगलाच दबाव असल्याचे संघाचे अध्यक्ष पी. के. सोनावणे यांनी सांगितले. माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या आमदार निधीतून संघाने इमारतींच्या गच्चीवरील डांबरीकरण, शौचालयांच्या पाईपलाईनची कामे, सांडपाण्याची कामे अशी सर्व लोकोपयोगी कामे करून घेतली.
वसाहतीमधील कामांसाठी संघाने कधीच कोणत्या एका राजकीय पक्षाला अधिक महत्त्व दिले नाही. रहिवाशांच्या कामासाठी संघ सर्वच लोकप्रतिनिधींना समान महत्त्व देत असल्याचे सोनावणे सांगतात.

पुनर्विकासासाठी संघर्ष सुरूच
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ भाडेकरू संघ वसाहतीच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहे. सर्व रहिवाशांना एकाच आकाराची घरे याचठिकाणी मिळावी, अशी संघाचे मागणी आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशाराही संघाने शासनाला दिला आहे.

विकासाची साधने
वसाहतीमध्ये प्राथमिक शाळा, व्यायाम शाळा, संगणक प्रशिक्षण अशा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या सर्व सोयी आहेत. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे एक कार्यालय असून त्याद्वारे रहिवाशांना मनोरंजनाचे एक साधन उपलब्ध झाले आहे.

Web Title: An illustrative example of social equality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.