‘मी आत्महत्या करायला जातोय’
By Admin | Published: July 4, 2017 07:25 AM2017-07-04T07:25:52+5:302017-07-04T07:25:52+5:30
वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड परिसरात एका २४ वर्षीय व्यावसायिकाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला. आयुष्य संपवायला चालल्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड परिसरात एका २४ वर्षीय व्यावसायिकाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला. आयुष्य संपवायला चालल्याचे त्याने वडिलांना सांगितले होते. नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या घरच्यांचे म्हणणे असून या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
पवन सिंग असे त्याचे नाव असून तो खारमध्ये राहत होता. सिंग हा गेल्या अनेक महिन्यांपासून नैराश्यात होता. १ जुलैला रात्री साडेबाराच्या सुमारास तो घरातून निघाला. ‘मी आत्महत्या करायला जातोय’, असे त्याने वडिलांना सांगितले. स्वत:चा मोबाइलदेखील त्याने घरीच ठेवला. रागाच्या भरात मुलगा काही बोलला असेल, असे वाटल्याने तो गेल्यानंतर काही वेळाने वडिलांनी त्याच्या मोबाइलवर फोन केला. तेव्हा पवनचा मोबाइल घरीच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोबाइलमध्ये आत्महत्या करण्याच्या विविध पद्धती असलेले एक इंटरनेट पेज त्यांनी पाहिले. गेल्या तीन-चार दिवसांपासून पवन हे सतत वाचत होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी खार पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली. ज्यात पवन आत्महत्या करण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी नमूद केल्याचे वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी सांगितले. त्याने वरळी सी-लिंकवरून उडी मारली आणि आत्महत्या केल्याचेही ठाकरे यांनी नमूद केले.
सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला. ज्यात वांद्रे बॅण्डस्टॅण्ड परिसरात एका तरुणाचा मृतदेह खडकात अडकल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलालादेखील या ठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यानुसार त्याला खडकातून बाहेर काढून स्थानिक भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पवनच्या घरच्यांनीही रुग्णालयात धाव घेतली. ज्यात त्याची ओळख पटली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच कोणत्या गोष्टीमुळे तो इतका निराश झाला, याची चौकशी पोलीस सध्या करत आहेत.