Join us

मी मराठीच, माझा डीएनए भगवा! घुसखोरांविरुद्ध राज ठाकरे यांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 6:39 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट केले.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट केले. समझोता एक्स्प्रेस कायमस्वरूपी बंद करून भारतातील बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्याची मागणी त्यांनी केली. या मुद्द्यावर केंद्र सरकारला पाठिंबाही त्यांनी जाहीर केला.या अधिवेशनात पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणारा भगवा ध्वज स्वीकारण्यात आला. भगवा ध्वज आणि हिंदुत्व यावर राज यांनी आक्रमकपणे बाजू मांडली. त्यांनी प्रथमच भाषणाची सुरुवात ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो’ अशी साद घालून केली. आजवर ते ‘मराठी बांधवानो...’ असा उल्लेख करायचे. हिंदुत्व आणि मराठीबाबत माझ्या मनात वैचारिक गोंधळ नाही. २००६ साली पक्ष स्थापनेवेळी हाच झेंडा माझ्या मनात होता. परंतु तेव्हा अनेकांनी सोशल इंजिनीअरिंगचा मुद्दा रेटला. नवखा होतो, सांगणारे मोठे पाठीशी नव्हते. त्यामुळे मनातील भगवा झेंडा मागे राहिला. पण, डोक्यातून तो गेला नव्हता. त्यामुळेच सहा वर्षांपासून सणावाराला, शिवजयंतीला हाच झेंडा मनसे वापरत असल्याची आठवण त्यांनी करून दिली.

आजच्या राजकीय स्थितीमुळे भगवा स्वीकारल्याचा आरोप चुकीचा आहे. ही स्थिती योगायोग आहे. माझा रंग बदलला नाही. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो, अशा शब्दांत राज यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. मराठी व हिंदुत्व याविषयी वैचारिक गोंधळ नसल्याचे सांगतानाच याबाबत आक्रमक धोरण कायम राहणार असल्याचे राज म्हणाले. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर यांना आम्ही नाकारूच शकत नाही. पण जे धिंगाणा घालतील, त्यांना आडवे येणारच, असेही राज म्हणाले. अवघ्या अडीचहजारांत बांगलादेशी घुसखोर भारतात येतात. सर्व पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावले पाहिजे. समझोता एक्सप्रेस वगैरे बाबी बंद करा, अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी आणल्यानंतर देशभर मोर्च्यांना सुरूवात केली. काश्मिरातून ३७० कलम हटवणे, राम मंदिर उभारणीचा निकाल आणि सीएए असा सगळ्याचा राग एकत्रितपणे या मोर्च्यांतून निघत आहे. घुसखोरांच्या पाठी इथला मुसलमान उभा राहत असेल तर मग आम्ही इथल्यांना साथ का द्यायची, असा थेट सवालही त्यांनी केला.देशाच्या व आणि महाराष्ट्राच्या विशिष्ट भागांत अन्य देशांतील मौलवींची ये-जा वाढली आहे. तिथे काय सुरू आहे, याची बाहेरच्यांना कल्पना नाही. मात्र त्यांंंना काहीही कल्पना नसली तरी प्रत्यक्षात तिथे काहीतरी भयंकर शिजत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे मी स्वत: यासंदर्भात लक्ष घालून याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून याची माहिती देणार असल्याचे राज ठाकरे यांनी बोलताना सांगितले.माझा डीएनए व रंग भगवा असल्याचे स्पष्ट करण्यासाठी राज यांनी मनसेच्या १४ वर्षांतील विविध घटनांची यावेळी उपस्थितांना आठवण करून दिली.रझा अकदामीने धिंगाणा घातला तेव्हा फक्त महाराष्टÑ नवनिर्माण सेनेनेच विरोधी मोर्चा काढला. मनसेनेच पाकिस्तानी कलाकारांना हाकलले, सण-उत्सवात आडकाठी आल्यावर ठाम भूमिका घेतली, असे ते म्हणाले. मशिदीवरचे भोंगे बंद झाल्याची भूमिकाही मांडली होती. जशी आरती, तशी नमाज. आरती त्रास देत नाही, मग नमाजाचे भोंगे का त्रास देतायत, असा सवाल करीत, या भूमिका आजच्या नाहीत तर त्या पूर्वीही होत्या, असे राज ठाकरे म्हणाले.संघटनात्मक बाबी सोशल मीडियावर वाईट पद्धतीने आलेल्या चालणार नाही. याबाबत संंबंंधितांंंकडे काहीही केले तरी दुर्लक्ष केले जाणार नाही. यासंदर्भातील तक्रारी संबंधित नेते किंवा पक्षाच्या व्यासपीठावरच मांडायला हव्यात. सोशल मीडियावर काँमेंट दिसता कामा नये. अन्यथा पदावरून बाजूला करण्यात येईल, अशी ताकीद राज यांनी दिली.९ फेब्रुवारीला मोर्चादेशातील सर्व बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर काढण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारीला आझाद मैदानात मोर्चा काढणार असल्याची घोषणाही राज ठाकरे यांनी या वेळी केली.मनसेचे दोन झेंडेभगव्या ध्वजातील राजमुद्रेचा मान राखलाच पाहिजे. झेंडा वेडावाकडा पडलेला चालणार नाही. निवडणूक काळात राजमुद्रा असलेला ध्वज वापरायचा नाही. त्या काळात पक्ष निशाणी इंजिन असलेला झेंडा वापरला जाईल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :राज ठाकरेमनसेहिंदुत्व