Join us

VIDEO: पोलिसांना धक्काबुक्की केली? पळून गेले? संदीप देशपांडे 'त्या' घटनेवर पहिल्यांदाच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 8:13 PM

राज ठाकरेंच्या घरासमोर घडलेल्या हाय व्होल्टेज ड्रामावर संदीप देशपांडेंचं स्पष्टीकरण

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरासमोरून पक्षाचे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटल्याची चर्चा सुरू आहे. याबद्दल देशपांडेंनी एका व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. आम्ही कायम पोलिसांना सहकार्य केलं आहे. पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आम्ही कायद्याचा आदर करतो. पण खोट्या केसेस करणार असाल, तर ते कदापि सहन करणार नाही, अशा शब्दांत देशपांडेंनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर स्वत:ची बाजू मांडली.

पोलीस पकडत असताना निसटल्याचे, महिला पोलिसाला धक्काबुक्की केल्याचे आरोप संदीप देशपांडेवर होत आहेत. त्यावर देशपांडेंनी स्पष्टीकरण दिलं. 'आज सकाळी मी राज ठाकरेंना भेटायला गेलो होतो. माध्यमांच्या प्रतिनिधींनी बाईट मागितला. मी त्यांच्याशी संवाद साधत असताना दादर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कासार तिथे आले. त्यांनी मला बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला ताब्यात घेत आहात का, असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर ताब्यात घेत नाही, गर्दी होत असल्यानं बाजूला घेत असल्याचं त्यांनी सांगितलं,' अशा शब्दांत देशपांडेंनी घटनाक्रम सांगितला.

महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा, त्यामुळे त्या पडून जखमी झाल्याचा आरोपही देशपांडेवर केला जात आहे. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 'आम्ही तिथून निघून गेल्यावर टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या. धक्काबुक्कीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं दाखवत होते. मात्र माझा धक्का त्या महिला पोलिसाला लागलाच नाही. फुटेजमध्ये तसं स्पष्ट दिसत आहे. माझ्याभोवती ७ ते ८ पुरुष पोलीस अधिकारी होते. पुरुष अधिकारी उपस्थित असताना एका पुरुषाला महिला अधिकारी पकडायला जात नाही, हा प्रोटोकॉल आहे,' याची आठवणही त्यांनी करून दाखवली.

माध्यमांशी बोलत असताना पोलीस निरीक्षक कासार मला थोड्या अंतरावर घेऊन गेले. सकाळपासून मी कोणतंही आंदोलन करत नाही. मग मला ताब्यात का घेत आहात, असा प्रश्न मी त्यांना विचारला. आतापर्यंत आम्ही पोलिसांना सहकार्यच करत आलो आहोत. अनेकदा स्वत: मी पोलीस ठाण्यात हजर झालो आहे. पोलिसांचा आम्ही सन्मानच करतो. मी धक्काबुक्की केल्याचं, महिला पोलिसाला जखमी केल्याचं कासार साहेबांनी हृदयावर हात ठेवून सांगावं. मी खोटं बोलत असेन, पण सीसीटीव्ही फुटेज, माध्यमांचे कॅमेरे खोटं बोलणार नाहीत, असंही देशपांडे म्हणाले. मी पळून गेलो नाही. आम्ही अटकेला घाबरत नाही. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आलो आहे, असं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :संदीप देशपांडेमनसेराज ठाकरे