अधिकाऱ्यांचा मला गर्व - आयुक्त

By admin | Published: July 8, 2016 01:44 AM2016-07-08T01:44:41+5:302016-07-08T01:44:41+5:30

पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात मुंबई खड्ड्यात गेल्यामुळे विरोधी पक्षांनी आज आक्रमक भूमिका घेत सभागृह दणाणून सोडले़ गेल्या वर्षीच्या तुलनेत खड्डे कमी आहेत़ हे खड्डे बुजविणाऱ्या

I'm proud of the officers - Commissioner | अधिकाऱ्यांचा मला गर्व - आयुक्त

अधिकाऱ्यांचा मला गर्व - आयुक्त

Next

मुंबई : पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात मुंबई खड्ड्यात गेल्यामुळे विरोधी पक्षांनी आज आक्रमक भूमिका घेत सभागृह दणाणून सोडले़ गेल्या वर्षीच्या तुलनेत खड्डे कमी आहेत़ हे खड्डे बुजविणाऱ्या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मला गर्व आहे, अशा शब्दांत आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांची पाठराखण करीत दर्जेदार कामाची हमी दिली़
करोडो रुपये पालिकेने खर्च करूनही मुंबई खड्ड्यात असल्याचा संताप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी हरकतीच्या मुद्द्यांद्वारे व्यक्त केला़ त्यावर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेऊन सत्ताधारी व प्रशासनाला धारेवर धरले़ मागच्या वर्षी ५ जुलैपर्यंत मुंबईत दीड हजार खड्डे होते़ या वर्षी जूनच्या तीन आठवड्यांतच पावसाच्या एकूण कोट्यापैकी ३५ टक्के पाऊस झाला आहे़ तरीही खड्ड्यांची संख्या चारशेपर्यंत आहे़ ठेकेदार न मिळाल्यामुळे हमी कालावधी वगळता अन्य खड्डे अधिकारी व कर्मचारी बुजवित आहे़ असे सांगत आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांची पाठ थोपटली़ पेव्हर ब्लॉक काढून टाकण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला़ मात्र संपूर्ण मुंबईत पेव्हर ब्लॉक काढून टाकेपर्यंत पेव्हर ब्लॉकला पर्याय पेव्हर ब्लॉकच असणार आहे़, असे स्पष्ट केले.
पुढच्या वर्षी आम्हालाच खड्डे भरावे लागणार आहेत, अशी टोलेबाजी विरोधकांनी सुरू ठेवली़ यामुळे खवळलेल्या सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव महापौरांच्या खुर्चीच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या़ तसे विरोधी पक्षाच्या महिला नगरसेविकाही पुढे सरसावल्या़ यामुळे दोन्ही बाजूने घोषणाबाजी व निदर्शने सुरू झाली.

दर्जेदार कामाची हमी
कोल्डमिक्सने खड्डे बुजविण्यात येत असून, प्रत्येक पाचपैकी एक नमुन्याची तपासणी केली जात आहे़ मात्र हॉटमिक्स प्रभावी असले तरी पावसाने उघडीप दिल्यानंतरच खड्डे या मिश्रणाने बुजविणे शक्य आहे़ तरीही या वेळेस रस्त्यांचे काम दर्जेदारच होणार, अशी हमी आयुक्तांनी दिली़ (प्रतिनिधी)

‘तिकडेही’ बघा
मुंबईत १२५ कि़मी़ रस्ते मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या अख्यत्यारीत आहेत़ तर १०० रस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, म्हाडा आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत आहेत़ असे एकूण १४ टक्के रस्ते अन्य प्राधिकरणाकडे असून, अनेकवेळा त्यांनी हस्तांतरित केलेल्या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असते़ मात्र समन्वयाचा अभाव असल्याने खड्डे तसेच राहत होते़ या वर्षी सर्व प्राधिकरणामध्ये समन्वय असेल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले़

Web Title: I'm proud of the officers - Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.