मी किडनॅपर बोलतोय...
By admin | Published: March 28, 2015 12:35 AM2015-03-28T00:35:38+5:302015-03-28T00:35:38+5:30
अपहरण केल्याची बतावणी करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणारी टोळी शहरात सक्रिय झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मनीषा म्हात्रे ल्ल मुंबई
‘हॅलो, किडनॅपर स्पीकिंग... तेरा बच्चा मेरे पास हैं़़! बच्चे को छुडाना हो तो, पैसा लेकर बताये हुए पते पे आ जाना,’ असे हिंदी चित्रपटात दाखवण्यात येणारे डायलॉग सध्या हरवलेल्या मुलांच्या पालकांना फोनवर ऐकावे लागत आहेत. हरवलेल्या मुलांची अपहरण केल्याची बतावणी करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणारी टोळी शहरात सक्रिय झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईतून हरवलेल्या मुलांचे अपहरण झाल्याची बतावणी करून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीच्या सदस्यांविरोधात वांद्रे, मुलुंड नवघर, भांडुप, एमआरए मार्ग, एमएचबी आणि शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या टोळीचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथकेही मागावर आहेत.
भांडुपच्या सुभाष नगरमध्ये कुटुंबासह राहणारा जॉनी मारु ती जाधव हा १४ वर्षीय मुलगा २४ फेब्रुवारीला गायब झाला होता. त्याच्या शोधासाठी पालकांनी भांडुप पोलीस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार करून नातेवाईक आणि मित्रांकडे त्याचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी फोटोसह मुलगा हरविल्याचे पोस्टर्स शहरात जागोजागी लावले. मुलगा हरवल्यानंतर दोनच दिवसांनी जाधव कुटुंबीयांना एका स्वयंघोषित किडनॅपरचा फोन आला. मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच जाधव कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र मुलगा सुखरूप सापडेल, यासाठी त्यांनी मागितलेली रक्कम देण्याची तयारी दर्शवली. यात पोलिसांची मदत घ्यावी, असे वाटल्याने जाधव कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ निरीक्षक प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या मुलाची सुटका करून किडनॅपरला रंगेहाथ पकडण्याची योजना आखली. किडनॅपरने सांगितल्यानुसार दादर स्थानकाच्या मिडल ब्रिजवर पैशांची बॅग ठेवून सापळा रचला. पण पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याचे लक्षात आल्याने किडनॅपरने पैशाने भरलेली बॅग न घेता पळ काढला. त्यानंतर काही दिवसांनी मुलगा बालसुधारगृहात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी मुलाची सुटका करून आणली.
मुलाचे जर अपहरण झालेले नव्हते, मग किडनॅपर नावाने फोन करणारा कोण, या विचाराने पोलीस चक्रावले. किडनॅपरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. आरोपीला मुलगा सापडला, हे समजू न देता पैसे देण्याची तयारी दर्शवत विक्रोळी स्थानकात तसेच डोंबिवलीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये पैशांची बॅग ठेवून पोलिसांनी सापळा रचला, पण ‘तो’ पोलिसांच्या हाती आला नाही. हा किडनॅपर अज्ञात टोळीचा सदस्य असल्याचे समजाताच गुन्हे शाखेने समांतर तपासाला सुरु वात केली.
एखादा मुलगा हरवला तर त्याचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करतात. त्यानंतर नातेवाइकांसह मित्रपरिवाराकडे शोध घेतला जातो. अखेर मुलगा न सापडल्यास त्याच्या फोटोसह पालकांचे मोबाइल नंबर टाकून पोस्टर्स जागोजागी चिटकविली जातात. या पोस्टर्समधून या टोळीचे सदस्य पालकांचे नंबर लिहून घेतात.
गोळा केलेल्या नंबरवर वेगवेगळ्या मोबाइल क्र मांकांवरून किंवा लोकल टेलीफोन बुथचा वापर करून मुलाचे अपहरण केले असून तो आमच्याकडे आहे, असे सांगून लाखो रु पये उकळले जातात.
अनोखी शक्कल : जाधव कुटुंबीयांना आलेला मोबाइल नंबर पोलिसांनी तपासला असता ट्रू कॉलरवरही तो क्रमांक किडनॅपर म्हणून सेव्ह केल्याचे आढळले. पालकांना घाबरवण्यासाठी या टोळीने लढवलेली ही शक्कल असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.