Join us

"मी अजून काँग्रेसमध्येच, हकालपट्टीबाबत अधिकृत माहिती नाही, जर तसं झालं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 5:12 PM

मला चिठ्ठीत लिहून मतदान करायला सांगितले, ते जनतेला सांगावे, तो पक्ष कोणता होता, महायुती की महाविकास आघाडी हे समोर येईल असं आव्हान झिशान सिद्दीकी यांनी केले आहे. 

मुंबई - माझ्या हकालपट्टीबाबत मला कुणीही अधिकृत कळवलं नाही. नाना पटोले यावर स्पष्टीकरण देतील. याआधीही मला मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवले तेव्हा ना अधिकृत ईमेल, ना कॉल, ना SMS आला होता. जर नाना पटोले माझ्या हकालपट्टीबाबत सांगत असतील तर त्याचे उत्तर तेच देतील. मला अधिकृत माहिती दिली नाही. मी अजूनही काँग्रेस पक्षात आहे. जर ते असं बोलत असतील तर हा गंभीर विषय आहे त्यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी दिली.

आमदार झिशान सिद्दीकी म्हणाले की, मी काँग्रेस पक्षात आहे. वांद्रे पूर्वचा विद्यमान आमदार आहे. जर माझ्याबाबतीत असं झालं तर ते दुदैवी आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, मतदार माझ्यासोबत आहेत पण तुम्ही शिवसेना यूबीटीला जागा द्यायच्या दबावाखाली हे करत असाल तर ते चुकीचे आहे. ठाकरेंसोबत अनैसर्गिक आघाडी आहे. त्यांची आणि काँग्रेसची विचारधारा जुळत नाही. जर त्यांना जागा द्यायची आहे त्यासाठी हे होत असेल तर दुर्दैवी असून त्यातून कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच चंद्रकांत हंडोरे यांच्या निवडणुकीतही असेच झाले होते. तेव्हाही नाना पटोलेंनी ६-७ आमदार असल्याचं बोलले होते, पण कुणाचे नाव घेतले नाही. आम्ही जे पक्षाने सांगितले तेच केले. मी काँग्रेस हायकमांडलाही सांगितले होते. तुम्ही चिठ्ठी दाखवा, ज्यात माझी सही आहे. माध्यमांत मला कुणाला मत द्यायला सांगितले हे जनतेला सांगावे. कुठलेही आरोप लावण्याआधी विचार करा. मोठमोठे नेते स्वत:ला वाचवण्यासाठी कदाचित आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांची नावे घेत आहेत. त्यांनीच क्रॉस व्होटिंग केले असावे, त्यांचे इतरांशी चांगले संबंध आहेत. आम्ही जे पक्षाने सांगितले ते केले. त्यांनी मला कुठल्या पक्षाला मतदान करायचे सांगितले होते हे जनतेला सांगावे. तो पक्ष महायुतीत होता की महाविकास आघाडीत ते कळेल असा दावाही झिशान सिद्दीकी यांनी केला.

दरम्यान, मी अजित पवारांच्या रॅलीत होतो ते दिसले. परंतु काँग्रेस पक्षाच्या बैठकीत मला बोलावलं जात नाही. मला निमंत्रण दिले जात नाही. माझ्या मतदारसंघात वर्षा गायकवाड यात्रा काढतात तिथे मला बोलावले जात नाही. मला का बोलावले जात नाही हे पक्षाने सांगावे. मी नेहमी पक्षाने जिथे बोलावले तिथे गेलो. काही कारणास्तव पक्ष मला बोलवत नाही. जर कारवाई झाली तर मी माझी बाजू मांडेन, माझ्याकडे लपवण्यासारखं नाही. वांद्रे पूर्व मतदारसंघातून मी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा विश्वास झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :काँग्रेसउद्धव ठाकरेशिवसेनामहाविकास आघाडीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४