‘आयएमए’ने स्वीकारला सत्याग्रहाचा मार्ग
By admin | Published: November 15, 2016 05:06 AM2016-11-15T05:06:40+5:302016-11-15T05:06:40+5:30
डॉक्टरांना प्रतिष्ठा मिळत असली तरी त्यांच्यापुढे असलेले प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. डॉक्टरांच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असून, वारंवार पाठपुरावा
मुंबई : डॉक्टरांना प्रतिष्ठा मिळत असली तरी त्यांच्यापुढे असलेले प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. डॉक्टरांच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असून, वारंवार पाठपुरावा करूनही सरकार दुर्लक्ष करीत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सरकारने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पण, एक वर्ष उलटूनही कोणतेही पाऊल उचलले नसल्याने १६ नोव्हेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनचे ३० राज्यांतील १ हजार ७६५ स्थानिक शाखा सत्याग्रह करणार आहेत. १६ नोव्हेंबर रोजी देशातील २ लाख डॉक्टर सकाळी ९ ते १ काम बंद ठेवणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी दिली. सत्याग्रहावेळी देशभरातील रुग्णालये, बाह्यरुग्ण विभाग सकाळी ९ ते १ दरम्यान बंद राहणार आहेत. पण, त्या वेळी आपत्कालीन आरोग्य व्यवस्था सुरू राहणार आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ देणार नसल्याचे आयएमएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. क्रॉसपॅथीला मान्यता मिळू नये, अॅलोपॅथी डॉक्टरांनीच मॉडर्न मेडिसिन लिहून द्यावी, नव्या येणाऱ्या वैद्यकीय आस्थापन कायद्यात (क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट) काही बदल करावेत, डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याला आळा घालण्यासाठी सक्षम कायदा आणावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी हा सत्याग्रह केला जाणार आहे. (प्रतिनिधी)