क्रॉसपॅथीच्या विराेधात आयएमए जाणार काेर्टात; एफडीएवर ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांतून संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:50 IST2024-12-29T13:49:37+5:302024-12-29T13:50:33+5:30
काही वर्षांपूर्वी आयुर्वेद शाखेच्या डॉक्टरांनीसुद्धा ब्रिज कोर्स करून ॲलोपॅथी प्रॅक्टिससाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळीही ‘आयएमए’ने त्याविरोधात भूमिका घेतली.

क्रॉसपॅथीच्या विराेधात आयएमए जाणार काेर्टात; एफडीएवर ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांतून संताप
मुंबई : होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीची औषधे लिहून देण्यास परवानगी असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) जाहीर करताच ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी संताप व्यक्त केला आहे. डॉक्टरांची शिखर संस्था असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने याचा तीव्र निषेध व्यक्त केला. या निर्णयाविरोधात आयएमए कोर्टात जाणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
काही वर्षांपूर्वी आयुर्वेद शाखेच्या डॉक्टरांनीसुद्धा ब्रिज कोर्स करून ॲलोपॅथी प्रॅक्टिससाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळीही ‘आयएमए’ने त्याविरोधात भूमिका घेतली. गेली अनेक वर्षे अन्य पॅथीचे डॉक्टर ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शासन दरबारी प्रस्ताव देत आहेत. अनेकांना त्यांची पॅथी सोडून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी आरोग्यमंत्री यांच्या भेटी यापूर्वीच घेतल्या आहेत. सरकारी निर्णय झाल्याने त्या डॉक्टरांना होमिओपॅथीची प्रॅक्टिस करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
अर्धवट डॉक्टर तयार होतील -
राष्ट्रीय स्तरावर आयएमएची भूमिका कायमच क्रॉसपॅथीच्या विरोधात राहिली आहे. प्रत्येक पॅथीच्या डॉक्टरांनी त्यांच्या पॅथीनुसार प्रॅक्टिस करावी. त्यांनी त्याच्यामध्ये संशोधन करावे. या अशा एक वर्षाच्या कोर्सने अर्धवट डॉक्टर तयार होतील. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होईल. अनेक वर्षे शिक्षण घेतल्यानंतर मॉडर्न मेडिसिनची प्रॅक्टिस करता येते. होमिओपॅथीला परवानगी देण्याचा विषय न्यायप्रविष्ट आहे. कोर्टाने त्यांना कुठलीही परवानगी दिली नाही. त्यांना कोर्स करण्याचा अधिकार आहे. मात्र, अशा पद्धतीने कुठलीही प्रॅक्टिस करण्यास परवानगी द्यावी, असे न्यायालयाने म्हटलेले नाही. आम्ही आता एफडीएच्या या निर्णयाविरोधातसुद्धा कोर्टात जाणार आहोत. - डॉ. संतोष कदम, अध्यक्ष, आयएमए (महाराष्ट्र).
काय आहे हा कोर्स? -
‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी’ (सीसीएमपी) हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांनाच ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात येते, असे एफडीएचे म्हणणे आहे. हा अभ्यासक्रम आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तयार केला आहे. ताे पूर्ण केल्यानंतर २०० गुणांची परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच त्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस काही प्रमाणात करता येणार आहे.
सध्या हा कोर्स शासनाच्या २२ मेडिकल कॉलेजेसमध्ये सुरू आहे. विद्यापीठाच्या सामायिक प्रवेश परीक्षा चाचणीमार्फत यांना प्रवेश दिला जातो. प्रत्येक महाविद्यालयात ५० ते ७५ विद्यार्थी या कोर्सला ॲडमिशन घेत असतात. तसेच त्यांना या कोर्सेसमध्ये बायोकेमिस्ट्री, फार्माकॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, केमिकल पॅथॉलॉजी असे विषय शिकविले जातात. त्यांना प्राथमिक तपासणीचे प्रशिक्षण दिले जाते.
ॲलोपॅथी विरुद्ध होमिओपॅथी आमने-सामने
होमिओपॅथी डॉक्टरांना एक वर्षाचा थिअरी अभ्यासक्रम पूर्ण करून ॲलोपॅथी मेडिसिन देण्याची मुभा दिली. तीन वर्षे मेडिसिनमध्ये आम्ही काम करतो. थिअरी शिकल्यावर ते औषध कसे वापरायचे, यासाठी मेडिसिन वाॅर्डमध्ये प्रशिक्षण असते. आमचा या निर्णयाला विरोध आहे.
- डॉ. शिवकुमार उत्तुरे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल
होमिओपॅथी डॉक्टरांनी अत्यंत आवश्यकता असल्यावरच रुग्णावर ॲलोपॅथी उपचार केले पाहिजेत. ज्या होमिओपॅथी डॉक्टरांनी फार्माकॉलाॅजीचा कोर्स केलेला नाही. असे डॉक्टर जेव्हा ॲलोपॅथी उपचार करतात, त्यामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ होऊ शकतो. डॉक्टरांनी ज्याचे प्रशिक्षण घेतले आहे, त्याच पॅथीची प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे हे गेल्या ३० वर्षांतील अनुभवावरून माझे मत झाले आहे.
-डॉ. मनोज केतकर, होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर
सीसीएमपी कोर्स करून परीक्षा देऊन मग ॲलोपॅथीची प्रॅक्टिस आम्ही करू शकतो. या कोर्समुळे आम्हाला नवीन ज्ञान मिळेल. प्रॅक्टिस करणारे डॉक्टर हे अनुभवीच असतात. या कोर्समुळे आम्ही अजून अपडेट होऊ. होमिओपॅथी मनाचा विचार करून रुग्णावर उपचार करतात. या कोर्समुळे शरीरावर आणि मनावर परिणाम याचा विचार करू शकतो.
- डॉ. अश्विनी बापट, होमिओपॅथी डॉक्टर
सीसीएमपी या कोर्सबद्दल बऱ्याच दिवसांपासून सुरू करायचे होते. हा कोर्स उत्तम आहे. एफडीएने काढलेले पत्रक योग्य आहे. सीसीएमपीमध्ये फार्मसी शिकवली जाते. त्याचा होमिओपॅथी डॉक्टरांना फायदा होईल.
- डॉ. गजानन थोरात, जनरल फिजिशियन