Join us

पुढील सहा दिवस मुसळधार पावसाचे, नागरिकांनो अशी घ्या दक्षता... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 13:13 IST

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केले आहे. 

मुंबई - हवामान खात्याने पुढील सहा दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आज शुक्रवार 7 जून ते सोमवार 11 जून या कालावधीत राज्यात विशेषत: कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ७ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवार, ८ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असून, वर्तविण्यात आली आहे.शनिवार, ९ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. १० व ११ जून रोजी मुंबईसह कोकणात सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केले आहे. 

नागरिकांनो अशी घ्या दक्षता... 

  •  मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.
  • घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
  • अति मुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत प्रवास टाळा.
  • घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वे व रस्ते  वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या.
  • पावसात विजा चमकताना झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूपासून दूर रहावे. अशावेळी पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
  • आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये 1077 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधावा.
  • मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधा.
  • हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरुन घ्यावी.
  • कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.  कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करुन  घ्यावी.

 

टॅग्स :मान्सून 2018पाऊसमुंबईचा पाऊस