Join us

आयएमईआय नंबर बदलणारे अटकेत

By admin | Published: August 16, 2015 2:27 AM

चोरी, बॅग लीफ्टींगपासून हत्या, बलात्कारासारख्या मोठया, संवेदनशील व गुंतागुंतीच्या गुन्हयांमध्ये पोलिसांना मोबाईल लोकेशनवरून तपासाची दिशा सापडले किंवा तपासला गती येते.

मुंबई : चोरी, बॅग लीफ्टींगपासून हत्या, बलात्कारासारख्या मोठया, संवेदनशील व गुंतागुंतीच्या गुन्हयांमध्ये पोलिसांना मोबाईल लोकेशनवरून तपासाची दिशा सापडले किंवा तपासला गती येते. हे लोकेशन शोधताना मोबाईलच्या सीमकार्डासोबत त्याचा आयएमईआय क्रमांकही महत्वाचा असतो. मात्र हा आयएमईआय क्रमांकच पलटी करण्याचे तंत्र आत्मसात करून तसे मोबाईल बाजारात विकणाऱ्या दुकलीला माता रमाबाई मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद जईद अब्दुल कुरेशी (२४), इफ्तियार अन्सारी (१९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मनिष मार्केट परिसरात मोबाईल दुरुस्तीच्या नावाखाली हे दोघे नोकीया, सॅमसंग आणि चायना बनावटीच्या मोबाईलचे आयएमईआय नंबर बदलून ते विकत होते किंवा बदलून देत होते. गेल्या दोनेक वर्षांपासून दोघांचा हा धंदा सुरू होता. या काळात प्रामुख्याने मोबाईल चोर या दोघांचे नियमित ग्राहक होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना चौकशीदरम्यन मिळाल्याचे समजते. चोरलेला मोबाईल हा त्याच्या आयएमईआय क्रमांकावरूनच सापडू शकतो. मात्र हा क्रमांक बदलल्यास तो सापडणे निव्वळ कठिण असल्याचे एका अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.शुक्रवारी या दोघांबाबत एमआरए मार्ग पोलिसांना माहिती मिळाली. सुरूवातीला पोलिसांनी एका तरूणाला ग्राहक बनवून दोघांकडे नंबर बदलण्यासाठी धाडले. माहितीत तत्थ्य आढळताच मनिष मार्केटमध्ये छापा घालून या दोघांना गजाआड करण्यात आले. आतापर्यंत या दोघांनी किती मोबाईलचे नंबर बदलले, कसे बदलले, कोणते सॉफ्टवेअर वापरले, नंबर बदलून घेणारे कोण, ते कशासाठी नंबर बदलून घेतात याबाबत एमआरए मार्ग पोलीस दोघांकडे अधिक चौकशी करत आहेत. ४ हजार रुपयांत मोबाइल ‘पलटी’ : चोरलेली वाहने किंवा गुन्हयात वापरल्या जाणाऱ्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर आणि चासी नंबर बदलला जातो. त्याला पलटी मारणे असे म्हणतात. कुरेशी व अन्सारी मोबाईल पलटी करण्यासाठी ४ हजार रूपये घेत. पोलिसांनी धाडलेल्या ग्राहकाला १५ मिनिटांत त्यांनी मोबाईलचा आयएमईआय नंबर बदलून दिला.