पत्रकारिता आणि नाट्यक्षेत्राची अपरिमित हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:11 AM2021-09-05T04:11:20+5:302021-09-05T04:11:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जयंत पवार हे नवोदित पिढीतील लेखक, पत्रकार आणि साहित्यिकांचा आधारवड होते. त्यांच्या सावलीत येणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जयंत पवार हे नवोदित पिढीतील लेखक, पत्रकार आणि साहित्यिकांचा आधारवड होते. त्यांच्या सावलीत येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या परिसस्पर्शाने त्यांनी प्रफुल्लित केले, प्रत्येकावर नाट्य- साहित्याचे संस्कार केले. पवार यांच्या अचानक जाण्याने पत्रकारिता आणि नाट्यक्षेत्राची अपरिमित हानी झाल्याची भावना दिग्गजांनी अभिवादन सभेत व्यक्त केली.
नाटककार आणि पत्रकार जयंत पवार यांचा स्मृती अभिवादन सभा शनिवारी प्रभादेवी येथे भूपेश गुप्ता भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रकाश रेड्डी म्हणाले, मध्यमवर्गीय गिरणी कामगारांच्या दुःखांना आपल्या नाटकातून वाट मोकळी करून देणारा नाटकाकर गेला आहे. वास्तवाशी भिडणारे नाटककार म्हणून त्यांची ओळख होती. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्षा प्रतिमा परदेशी म्हणाल्या, जयंत पवार गेल्याचे दुःख तशीच खंत आहे. जिवलग मित्र आमच्यातून गेला ही हानी भरून काढता येणार नाही.
जयंत पवार यांची उभे राहण्याची पद्धत, बोलायची पद्धत, आजही डोळ्यांसमोर आहे. त्याचे ‘अधांतर’ हे नाटक तीन वेळा पाहिले, आमच्यात कायमच साहित्य विचारांची देवाण-घेवाण होत असे, त्यातून व्यक्त होणं यात ताकद होती. जयंतच्या लिखाणावर अनेकदा टीकाही झाल्या. मात्र, न डगमगता त्याने सर्व परिस्थितीला तोंड दिले आणि मात केली. त्याचा स्मृतिगंध कायमच त्याच्या विचार आणि शब्दाच्या माध्यमातून सोबत असेल, असे मनोगत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.
जयंतला एकांकिकेच्या कारकीर्दीपासून पाहतो आहे. सुरुवातीला कमी बोलणारा, मग ठाम भूमिका घेणारा आणि मग थेट समीक्षक म्हणून सयंत आणि समग्र लिहिणारा अशी त्याची रूपे पाहिली आहेत. त्याची समीक्षा कधी येईल याची आम्ही वाट पाहायचो. त्याने आजवर अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या अजून प्रकाशित झाल्या नाहीत, त्याचीही दखल घ्यायला हवी, अशी भावना विजय केंकरे यांनी व्यक्त केली.
पहिले विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी झाले. त्यामध्ये जयंतचा मोठा वाटा होता. सांस्कृतिक आणि साहित्याच्या भणंग वातावरणात स्वतःचे म्हणणे मांडणारा तो होता. माणूस त्याच्या भोवतालासोबत साहित्यात आला पाहिजे, असे त्याला वाटायचे, असे मनोगत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे किशोर ढमाले यांनी व्यक्त केले. याखेरीज, या सभेत सुबोध मोरे, शफाअत खान, प्रसाद कांबळी, मंगेश कदम अशा अनेक दिग्गजांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.