Join us  

शाहू महाराजांच्या स्मृतिस्तंभाचे तातडीने सुशोभीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 6:20 AM

महापालिका, कार्यकर्ते आणि शाहूप्रेमींकडून अभिवादन

मुंबई : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिस्तंभाचे महापालिकेतर्फे सुशोभीकरण करण्यात आले आहे. स्मृतिस्तंभाचे रंगकाम आणि विद्युत रोषणाई यांचीही व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. शनिवारी येथे सामूहिक अभिवादनही करण्यात आले.

राजर्षी शाहू महाराजांचे गिरगाव खेतवाडी गल्ली क्र.१३ येथील पन्हाळा लॉज येथे निधन झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी महापालिकेने १२ फूट उंचीचा दगडी स्तंभ उभारला आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून या स्मृतिस्तंभाचे जतन आणि सुशोभीकरण पालिकेकडून झाले नाही. याकडे ‘लोकमत’ने वृत्ताद्वारे लक्ष वेधले होते. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने त्याची दखल घेतली आणि महापालिकेला सुशोभीकरण करण्याचे निर्देश दिले. शाहू महाराजांच्या १०१ व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाआधी शुक्रवारी एका दिवसात सर्व काम पूर्ण करा, असेही त्यांनी बजावले होते. त्यानंतर यंत्रणा हलली. महापालिका ‘डी’ प्रभाग कर्मचाऱ्यांनी तातडीने स्मृतिस्तंभाला भेट दिली.

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून...

महापालिका कर्मचाऱ्यांनी येथील परिसराची स्वच्छता करून खड्डे सिमेंटने बुजवले आहेत. तसेच स्तंभाच्या मागे असलेली भिंतही पिवळ्या, केशरी, निळ्या रंगाने रंगवली आहे. त्यावर सुंदर अशा फुलांचे  नक्षीकाम करण्यात आले आहे. स्मृतिस्तंभदेखील सुगंधी फुलांच्या हाराने सजविण्यात आला आहे. विविध फुलझाडांच्या कुंड्यांनी स्मारक स्थळ सुशोभित करण्यात आले आहे. स्तंभ परिसरात फोकस लाइट लावून प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये आणि इतर सुरक्षिततेसाठी पोलिसांची एक व्हॅन तैनात करण्यात आली आहे.