पोलिसांवरील शिस्तभंगाची तातडीने अंमलबजावणी, डीजींचा बडगा, तर घटकप्रमुख व कर्मचारी जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:26 AM2017-08-21T05:26:50+5:302017-08-21T05:27:21+5:30
पोलीस दलात कार्यरत असताना कर्तव्यात कसूर किंवा अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी, एखाद्या अधिकारी, अंमलदारावर होणाऱ्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. अन्यथा त्याच्या विलंबाबाबत संबंधित पोलीस घटक व कक्षप्रमुखांना जबाबदार धरले जाणार आहे.
- जमीर काझी
मुंबई : पोलीस दलात कार्यरत असताना कर्तव्यात कसूर किंवा अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी, एखाद्या अधिकारी, अंमलदारावर होणाऱ्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. अन्यथा त्याच्या विलंबाबाबत संबंधित पोलीस घटक व कक्षप्रमुखांना जबाबदार धरले जाणार आहे.
प्रशासनाच्या सुस्तपणामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित राहणाऱ्या शिक्षेमुळे त्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागते, तसेच न्यायालयाकडून याबाबत फटकारले जात असल्यामुळे पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलिसांच्या खात्यांतर्गत शिक्षेला स्थगितीशिवाय तातडीने अंमलबजावणी न झाल्यास, संबंधित कक्षप्रमुखावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
सव्वादोन लाखांहून अधिक मनुष्यबळ असलेल्या राज्य पोलीस दलातील काही हजारावर अधिकारी, कर्मचाऱ्याना त्यांच्या कर्तव्यातील कसुरीबाबत वेतनवाढ, दंड किंवा अन्य स्वरूपाची शिक्षा झाली आहे. मात्र, संबंधितांना ती अद्याप लागू करण्यात नाही, तसेच त्याची नोंद संबंधित अधिकारी, अंमलदाराच्या सेवापट, सेवा पुस्तिकेत करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस मुख्यालयाने केलेल्या एका तपासणीतून पुढे आली आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठतेच्या आधारावर संबंधित अधिकारी, कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरत असताना, त्यांच्यावरील शिक्षेची कारवाई प्रलंबित असल्याने, प्रशासनाकडून त्याला बढतीपासून वंचित ठेवले जाते. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचारी याविरुद्ध मॅट व न्यायालयात धाव घेतात. कोर्टही अशा प्रकरणात प्रशासनाच्या सुस्तापणाबाबत ताशेरे ओढत, पोलिसांच्या बाजूने निकाल देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी या प्रकरणी पोलीस अधिनियमानुसार घटकप्रमुखांना जबाबदार धरण्याचे निश्चित केले आहे.
पोलीस अधिकारी, अंमलदारांच्या शिस्तभंगप्रकरणी शिक्षेची अंमलबजावणी प्रलंबित राहिल्याने, त्यांच्या बढती, पदकासाठीच्या यादी वेळी फटका बसतो. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई वेळेत व त्वरित करण्याची सूचना घटक प्रमुखांना दिल्या आहेत.
- सतीश माथुर, पोलीस महासंचालक