Join us

कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करा; देवेंद्र फडणवीसांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 2:05 PM

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनाग्रस्त भागात तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. 

मुंबई: मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात ४० हून अधिक ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. या गावात अद्यापही बचावकार्य सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर तळीये गावाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रवाना झाले आहेत. याचदरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनाग्रस्त भागात तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. 

देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले की, कोकणची भौगोलिक स्थिती आणि सातत्याने येणारी संकटं पाहता कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्यात यावी. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  तसेच इतर धोकादायक गावे तत्काळ ओळखून, त्यासाठीचे सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये 'रिस्क असेसमेंट' तातडीने करण्यात यावे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

कोकण, पश्चिम महाराष्ट्र विशेषत: महाडनजिक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत तसेच रोखीने आर्थिक मदत सुद्धा राज्य सरकारच्या वतीने लगेच दिली जावी. पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सातत्याने येणारी संकटं पाहता थोडा दूरगामी विचार सुद्धा राज्य सरकारने करण्याची गरज आहे. तळिये गावात घरे नव्याने पण सुरक्षित ठिकाणी बांधून सर्व नागरी सुविधा नागरिकांना निर्माण करून द्याव्यात. असे करताना धोकादायक क्षेत्राबाहेर हे पुनर्वसन असावे, अश्या विविध मागण्या देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना मुख्यंमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण आवाहन केले होते. ते म्हणाले होते की, राज्यात जिथे जिथे डोंगर उतारावर आणि डोंगराखाली वस्त्या आहेत. त्यांना आम्ही स्थलांतरीत करण्याचे काम सुरू केले आहे. कारण रस्ते खचत आहेत. काही ठिकाणी पूल गेलेले आहे. अशा ठिकाणी जे नागरिक राहत आहेत, तेथे राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करावं. जिथे धोका निर्माण होऊ शकतो. तिथून नागरिकांना स्थलांतरीत केलं जाईल. पावसाचा अंदाज वर्तवता येतो, पण ढगफुटीचा अंदाज व्यक्त करता येत नाही. तसेच दरड कुठे कोसळेल याचाही अंदाज वर्तवता येणार नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते.

टॅग्स :कोकणदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेपूरमहाराष्ट्र