मुंबईतील सर्व मॅनहोलची तातडीने तपासणी, भांडुप येथील घटनेच्या व्हिडीओने उडवली पालिका प्रशासनाची झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 10:21 PM2021-06-10T22:21:11+5:302021-06-10T22:22:21+5:30
भांडुप येथील उघड्या मॅनहोलमध्ये महिला पडताना वाचल्या होत्या. घटनेचा व्हिडीओ झाला होता व्हायरल.
मुंबई - भांडुप येथील उघड्या मॅनहोलमध्ये दोन महिला पडता पडता वाचल्याचा व्हिडीओ गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावरून व्हायरल झाला. याची गंभीर दखल घेऊन सर्व रस्त्यांवरील मॅनहोलची तातडीने आणि नव्याने तपासणी करण्याचे सक्त निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
भांडूप (पश्चिम) येथील व्हिलेज रस्त्यावर पूर्वेला असलेल्या एका मॅनहोलचे झाकण बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे निघाले. यामध्ये दोन महिला त्यात पडताना वाचल्याची चित्रफित सर्वत्र वायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयाने ते मॅनहोल बंद करून सुरक्षित केले. मात्र अशा काही घटना यापूर्वी घडल्या असून निष्पाप पादचाऱ्यांचे बळी गेले आहेत.
पावसाळ्यापूर्वी सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते. परंतु, बुधवारी मुसळधार पावसानंतर काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी मॅनहोलचे झाकण हलविले गेले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व रस्त्यांची पाहणी करुन मॅनहोलची तपासणी करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.
आधुनिक कुलूपबंद मॅनहोलची झाकण बसविणार..
महापौरकिशोरी पेडणेकर यांनी भांडुप येथील सदर मॅनहोलची पाहणी केली. साचलेल्या पाण्याच्या दाबामुळे पदपथावरील एफआरपी प्रकारातील मॅनहोल झाकण निखळले. ही बाब धोकादायक असल्याने आधुनिक कुलूपबंद (लॉक अँड की) पद्धतीने मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व मॅनहोलची झाकणे बसविण्यात यावी, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले.