केबल आॅपरेटरना त्वरित परवाना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2016 02:05 AM2016-03-04T02:05:26+5:302016-03-04T02:05:26+5:30
केबल आॅपरेटर्स यांच्या परवान्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला
मुंबई : केबल आॅपरेटर्स यांच्या परवान्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. केबल आॅपरेटर्सने दिलेले शपथपत्र ग्राह्य धरून एका दिवसात केबल आॅपरेटर्सना परवाना देण्याचे आश्वासन उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. या वेळी ठाकरे यांनी सांगितले की, ‘मुंबईतील सुमारे २ हजार ५००हून अधिक केबल आॅपरेटर्सना अधिकृतपणे व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेला ४/२/ब परवाना मिळत नव्हता. या प्रश्नी केबल आॅपरेटर्सचे शिष्टमंडळ वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना भेटले. राज्य शासनाच्या ४/२/ब परवान्याअभावी केबल आॅपरेटर्सना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले. महत्त्वाची बाब म्हणजे, कित्येक वर्षांपासून अधिकृत काम करत असतानाही, परवाना नसल्यामुळे केबल आॅपरेटर्स शासन दरबारी अनधिकृत ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. परवान्याअभावी शासनाचे महसुली नुकसान होत असल्याचे ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. त्यामुळे तत्काळ परवाना मिळण्याची व्यवस्था करावी, या मागणीचे चन्ने यांनी स्वागत केल्याचे मनसेने सांगितले. (प्रतिनिधी)