उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर तत्काळ नियुक्त करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:52 AM2020-04-28T05:52:59+5:302020-04-28T05:53:28+5:30
ठाकरे यांची नियुक्ती तातडीने करण्याची व राजकीय अस्थिरता दूर करण्याची शिफारसवजा विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी घेतला
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती तातडीने करण्याची व राजकीय अस्थिरता दूर करण्याची शिफारसवजा विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी घेतला. तसे विनंती पत्र राज्यपालांना पाठवण्यात येणार आहे.
सध्या कोरोनाच्या संकटकाळात शासन-प्रशासन जोमाने संकटाचा मुकाबला करत आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदवरील नियुक्तीचा निर्णय तत्काळ घ्यावा असे राज्यपालांना लेखी कळविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली
या बैठकीत पुन्हा एकदा आपल्याच आमदारकीबाबत राज्यपालांना विनंती करण्यात येणार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. बैठक घेण्याचे लेखी अधिकार त्यांनी अजित पवार यांना दिले होते. ९ एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नेमावे अशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली होती.त्याही बैठकीच्या अध्यक्षस्थानी अजित पवार हे होते. मात्र उपमुख्यमंत्री हे पद संवैधानिक नाही असा आक्षेप घेण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांनी आज पवार यांना मंत्री म्हणून बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविण्याचे अधिकार दिले. 9 एप्रिल ला मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशी वर राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही तो तातडीने घ्यावा अशी विनंती त्यांना करण्याचे मंत्रिमंडळात आज ठरविण्यात आले.त्यामुळे आता नव्याने करण्यात आलेल्या शिफारशीवर राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.