गोरेगावातील नाले सफाईची शिल्लक कामे त्वरित पूर्ण करा, सुभाष देसाईंच्या पालिका प्रशासनाला सूचना
By मनोहर कुंभेजकर | Published: May 24, 2023 02:27 PM2023-05-24T14:27:02+5:302023-05-24T14:27:39+5:30
देसाई यांनी आर दक्षिण विभागातील प्रेमनगर,शास्त्रीनगर व ओशिवरा नाल्यांची पाहाणी केली आणि नाल्यांची शिल्लक सफाई कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मुंबई - मुंबईतील 98 टक्के नाले सफाई पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पावसाळ्यात नाले तुंबून त्याचा त्रास गोरेगावकरांना होऊ नये यासाठी आणि पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासनाने गोरेगावातील केलेल्या नालेसफाईच्या कामांची आज शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई यांनी पाहाणी केली.येथील नाले सफाईची शिल्लक कामे त्वरित पूर्ण करा आणि ज्या ठिकाणी सखल भागात पाणी तुंबते त्याठिकाणी पालिका प्रशासनाने शक्तिशाली पंप बसवावेत अश्या सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला दिल्या.
देसाई यांनी आर दक्षिण विभागातील प्रेमनगर,शास्त्रीनगर व ओशिवरा नाल्यांची पाहाणी केली आणि नाल्यांची शिल्लक सफाई कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगर व सामंत वाडी या सखल भागातील नागरिकांना पावसाळ्यात पाणी साचून त्रास होऊ नये यासाठी तेथे शक्तीशाली पंप बसवावेत असा त्यांनी आग्रह धरला. यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी दिपक सुर्वे, दिलीप शिंदे, अजय नाईक,राजू पाध्ये, लक्ष्मण नेहरकर तसेच पालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.