मनोहर कुंभेजकर
मुंबई : अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी येथील ईएसआयएस रुग्णालयाला १७ डिसेेबर २०१८ रोजी भीषण आग लागली होती. यामध्ये १४ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सदर हॉस्पिटल बंदच असून येथील डॉक्टर,स्टाफ,अधिकारी यांना कांदिवली (पूर्व) येथील ईएसआयएस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. एकेकाळी ५०० बेडची क्षमता असलेल्या आणि औद्योगिक आस्थापनातील गरजू कामगारांना चांगली वैद्यकीय सेवा देणारे हॉस्पिटल असा याचा नावलौकिक होता. मात्र आगीच्या घटनेनंतर सदर हॉस्पिटल सध्या मृत अवस्थेत आहे.सदर हॉस्पिटल हे सध्या भटक्या कुत्र्यांचा अड्डा झाला आहे.
या हॉस्पिटलच्या नव्या इमारतीचे काम या आगीच्या घटनेनंतर सध्या अपूर्ण अवस्थेत आहे. मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतच असून सदर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही असा अनेक रुग्णांच्या कुटुंबियांचा अनुभव आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी येथील ईएसआयएस रुग्णालयाचे तातडीने कोविड रुग्णालयात रूपांतर करा, अशी आग्रही मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अँड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई मेल द्वारे केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या मागणीची तातडीने दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित खात्याला ईमेल पाठवल्याची माहिती पिमेंटा यांनी दिली.
राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने एनएससीआय, बीकेसी, नेस्को प्रदर्शन केंद्र आणि बर्याच शाळा व जिमखाने येथे कोरोना व्हायरस रुग्णांसाठी सुविधा व्यवस्था केली आहे.त्याचप्रमाणे अपग्रेडेशनसह ईएसआयएस हॉस्पिटल अल्प कालावधीत पुन्हा सुरू केल्यास गरजू कोरोना रुग्णांना येथे वेळेवर उपचार मिळू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आधीच अंधेरी (पूर्व) मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालय ओव्हरबर्ड झाले आहे आणि शहरातील व उपनगरातील अनेक पालिका व खाजगी रुग्णालयांनी देखिल आमच्याकडे बेड नसल्याचे सांगून कोरोना व्हायरस बाधीत रुग्णांकडे चक्क पाठ फिरवलेली आहे.त्यामुळे तातडीने येथील ईएसआयएस हॉस्पिटल शासनाने केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाकडून ताब्यात घेऊन सदर रुग्णालय पुन्हा लवकर सुरू करून त्याचे कोविड रुग्णालयात रूपांतर करा अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनने शेवटी केली आहे.