महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजीस्टची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय प्रयोगशाळा व्यवसायासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी नुकत्याच नियुक्त केलेल्या समितीत अवैध चालकांचा समावेश असल्याचा आराेप करीत हा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजी या संघटनेने केली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार, मार्गदर्शन तत्त्वे तयार करणाऱ्या समितीचे सदस्य जर प्रयोगशाळा तंत्रज्ञ असणार असतील तर ही वैद्यकशास्त्र व कायद्याची क्रूर थट्टा ठरेल आणि परिणामी राज्यातील रुग्णांचे भवितव्य अत्यंत अंधकारमय हाेईल, असे मत असोसिएशनने मांडले. असोसिएशनचे डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले की, वैद्यकीय प्रयोगशाळा चालविण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे पॅथॉलॉजिस्ट यांचे अभिप्राय व मत या सर्व विषयांमध्ये महत्त्वाचे आहे. केवळ अनुभवी पॅथॉलॉजिस्ट व पॅथॉलॉजी संघटनेचे प्रतिनिधी या समितीत असणे अपेक्षित आहे, कुठल्याही तंत्रज्ञानाचा या समितीत समावेश करता येऊ शकत नाही.
समितीतील सर्व अशासकीय सदस्य तंत्रज्ञ आहेत; त्यांना पॅथॉलॉजिस्टविना स्वतंत्रपणे प्रयोगशाळा चालविण्याचा कोणताही वैधानिक अधिकार नाही. सध्या ते अवैध लॅबोरेटरी चालविण्याचा बोगस वैद्यक व्यवसाय करीत आहेत, त्या सर्व सदस्यांवर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ नुसार अवैध व्यवसाय म्हणून कारवाई करणे अपेक्षित असल्याचे मत असाेसिएशनने मांडले.
* समितीतील अशासकीय सदस्यांची चौकशी करावी
आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या समितीत पाच अशासकीय सदस्य आहेत. त्यांना पॅथॉलॉजिस्टविना स्वतंत्रपणे प्रयोगशाळा चालविण्याचा कोणताही वैधानिक अधिकार नाही. सध्या ते अवैध लॅबोरेटरी चालविण्याचा बोगस वैद्यक व्यवसाय करीत आहेत. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ नुसार अवैध वैद्यक व्यवसाय म्हणून कारवाई करावी. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्यावतीने आयोजित केलेली पूर्वनियोजित बैठक लवकरात लवकर घ्यावी, त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीची गहाळ झालेली फाईल तत्काळ तयार करावी.
- डॉ. संदीप यादव
अध्यक्ष महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड बायोलॉजीस्ट
........................................................