मुंबई : माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाच्या इमारतीमध्ये दररोज सुमारे अडीच हजारांपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत असतात. सुदैवाने सोमवारी येथील नवव्या व त्यानंतर दहाव्या मजल्याला लागलेल्या भीषण आगीत जीवितहानी झाली नाही. आग लागल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी त्वरित इमारतीबाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
इमारतीच्या मुख्य भागातील नवव्या मजल्याला सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. ती दहाव्या मजल्यावर पसरली. आग लागल्यावर पंधरा मिनिटांत कर्मचारी खाली उतरल्याने मोठा धोका टळल्याचे कर्मचारी किशोर गुरव यांनी सांगितले. या वेळी राज्यकर आयुक्त संजीव कुमार बैठकीनिमित्त दिल्लीला गेले होते, आगीची माहिती मिळताच ते मुंबईकडे रवाना झाले, असे सांगण्यात आले.सावधगिरी म्हणून एनडीआरएफचे पथक येथे दाखल झाले होते. सुमारे वर्षभरापूर्वी या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट व्हीजेटीआयने केले. त्यांनी अग्निसुरक्षेबाबत आक्षेप घेतल्यानंतर या विभागाने इमारतीच्या परिसरातील पार्किंग सम विषम पद्धतीने सुरू केले. मात्र फायर आॅडिट झाले की नाही, याबाबत सांगण्यास प्रशासनाने असमर्थता व्यक्त केली. इमारतीचा दहावा मजला अनधिकृत असून त्यामुळे इमारतीचा भार वाढला असून तो पाडण्याची शिफारस व्हीजेटीआयने केल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, राज्यकर आयुक्त विभागाचा प्रशासकीय विभाग आता आगीतील नुकसानीचा आढावा घेत आहे.मंत्रालयाला आग लागली तेव्हा ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या दिल्या होत्या. एअर कंडिशनरमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यातून जो स्पार्क झाला त्यामुळे आग लागली. येथील लोकांनी फायर ब्रिगेडला कळविले. महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांना माहिती दिली. सर्वांनी मदत-बचावकार्यासाठी तातडीने व्यवस्था केली. त्यामुळे आग पूर्णपणे आटोक्यात आली.- अजित पवार, उपमुख्यमंत्रीअजून चौकशी झालेली नाही, त्यामुळे आगीचे कारण सांगता येणार नाही. इमारतीचे काम सुरू होते. दुर्घटनेत हानी झाली नाही. कारण वेगाने मदत व बचावकार्य झाले. फायर सेफ्टी, स्ट्रक्चरल सेफ्टीच्या दृष्टीने सेल्स टॅक्स डिपार्टमेंटला जे काही मुद्दे सांगितले होते; त्यांनी त्याची पूर्तता केली आहे.- प्रवीण परदेशी,आयुक्त, मुंबई महापालिकाआम्ही चारही बाजूंनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग बाजूच्या विंगमध्ये किंवा खाली पसरू दिली नाही. कमीत कमी वेळेत आगीवर नियंत्रण मिळविले.- प्रभात रहांगदळे,मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुखबांधकामादरम्यान अग्निप्रतिबंधक साहित्याचा वापर करणे गरजेचे आहे. आपण नियम पाळले पाहिजेत. फायर रेटेड साहित्य वापरले पाहिजे. इलेक्ट्रिक आॅडिटही महत्त्वाचे आहे.- प्रताप करगुप्पीकर,माजी प्रमुख, मुंबई अग्निशमन दलमोठी शिडी आल्यानंतर कामाला वेगघटनास्थळी सुरुवातीला आलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांमध्ये मोठी शिडी नसल्याने नवव्या व दहाव्या मजल्यावर लागलेली आग विझवण्यात अडचणी येत होत्या. ३६ मीटर उंच शिडी आल्यानंतर आग विझवण्यास वेग आला. जीएसटी इमारतीसमोर असलेल्या सेंट पीटर शाळेला सावधगिरीचा उपाय म्हणून सुट्टी देण्यात आली होती.इमारत दुरुस्तीचा फटका?गेल्या काही महिन्यांपासून या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्याचा फटका बसून आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. इमारतीच्या दुरुस्ती कामामध्ये वेल्डिंगचे कामही केले जात आहे. त्यामध्ये ठिणगी उडून आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी नाकारलेली नाही. तसेच, कामगारांनी केलेले सिगरेट, विडी सेवन यामुळेदेखील आग लागल्याची शक्यता वर्तवली जात असून तपास सुरू आहे.