६ हजार बांधकामांवर तातडीने स्प्रिंकलर्स, स्मॉग गन्स लावा, नाहीतर कामेच थांबवू!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 10:43 AM2023-10-26T10:43:13+5:302023-10-26T10:43:51+5:30

प्रदूषण नियंत्रणासाठी  पालिकेची मार्गदर्शक तत्त्वे, बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही आवश्यक, बांधकाम संबंधित वाहनाची पीयूसी अत्यावश्यक, वाट्टेल तिथे कचरा जाळला तर कठोर कारवाई होणार.

immediately install sprinklers smog guns on 6 thousand constructions otherwise we will stop the works bmc guidlines | ६ हजार बांधकामांवर तातडीने स्प्रिंकलर्स, स्मॉग गन्स लावा, नाहीतर कामेच थांबवू!

६ हजार बांधकामांवर तातडीने स्प्रिंकलर्स, स्मॉग गन्स लावा, नाहीतर कामेच थांबवू!

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या सहा हजार बांधकामांच्या ठिकाणी येत्या १५ दिवसांत स्प्रिंकलर्स आणि ३० दिवसांत स्मॉग गन्स न लावल्यास बांधकामे थांबवली जातील, असा इशारा मुंबई महानगरपालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठीची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना दिला आहे. 

बांधकाम, वाहतूक आदी कारणांमुळे शहरात वाढत चाललेले वायू प्रदूषण रोखण्याकरिता मुंबई महापालिकेने नवी नियमावली आणली असून, बांधकाम व्यावसायिकांसह सार्वजनिक प्रकल्प व आस्थापनांच्या हालचालींवरही यापुढे पालिकेचे लक्ष असेल, असे स्पष्ट केले आहे. कंत्राटदारांकडून बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारा बांधकाम साहित्याचा आणि पाडकामाचा राडारोडा हा रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणावर फेकून दिला जातो. त्यामुळे प्रदूषणात भर पडते.

यासाठी पालिकेने वॉर्ड स्तरावर विशेष पथकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. प्रत्येक विभागात सहायक आयुक्त हे या विशेष पथकांचे प्रमुख असणार असतील. प्रत्येक वॉर्डाचा आकार, लोकसंख्या याप्रमाणे विशेष पथकांची रचना करण्यात येणार आहे. त्यानुसार लहान वॉर्डात २, मध्यम वॉर्डात ४ तर मोठ्या वॉर्डात ६ विशेष पथके तैनात असतील. प्रत्येक पथकात वॉर्डातील २ अभियंते, एक पोलिस अधिकारी, एक गाडी आणि एका मार्शलचा समावेश असेल. या पथकांच्या तत्काळ नियुक्त्या करून कारवाईच्या सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

सर्वांसाठी बंधनकारक

मार्गदर्शक तत्त्वे बंधनकारक असून, त्यांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. यात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष पथके बांधकामांच्या ठिकाणी अचानक भेटी देऊन पाहणी करतील. पालिका प्रशासनाने दिलेल्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होत नसल्यास बांधकामांना काम थांबविण्याची सूचना देऊन कारवाई करण्यात येईल. मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू असून, येत्या १५ दिवसांत या ठिकाणी स्प्रिंकलर्स आणि ३० दिवसांत स्मॉग गन्ससाठी अल्टिमेटम देण्यात आला आहे. सर्व बांधकामे आणि विकासकांना वेळेचे हे बंधन पाळणे बंधनकारक असणार आहे.

पालिकेची मार्गदर्शक तत्त्वे

- एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट आणि एक एकरपेक्षा कमी भूखंडावर किमान २५ फूट उंचीचे लोखंडी, पत्र्यांचे आच्छादन किंवा कापडांचे आच्छादन असावे.

- तुषार फवारणी (स्प्रिंकलर) यंत्रणा असावी. धूळ उडू नये, यासाठी दिवसातून किमान चार ते पाच वेळा पाण्याची फवारणी करावी. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही आवश्यक आहे.

- बांधकामांशी संबंधित प्रत्येक वाहनाची पीयूसी चाचणी वेळेवर झाली आहे, हे निश्चित करावे. अन्यथा यंत्रणेने तत्काळ कारवाई करावी.

- सर्व बांधकामांच्या ठिकाणी वायू प्रदूषण किती आहे याची नोंद दाखविणारे मॉनिटर्स दाखवणे आवश्यक आहे. पालिकेला आवश्यक असेल तेव्हा त्यावरील नोंद उपलब्ध करणेही आवश्यक असणार आहे.

- या शिवाय एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमआयडीसी आदी यंत्रणा तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको अशा यंत्रणांनी बांधकामाच्या ठिकाणी या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.

- एमआयडीसी परिसरातील बीपीसीएल, एचपीसीएल आणि इतर रिफायनरींच्या प्रदूषणावर नजर ठेवण्याची जबाबदारी एमपीसीबीची असणार आहे. पुढील एका महिन्यासाठी रोज प्रदूषणाची नोंद करून त्यांच्यावर एमपीसीबीकडून कारवाई करण्यात येईल. ही माहिती शहर व उपनगरे यांच्या अतिरिक्त आयुक्तांनाही दिली जाईल.

- कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडवर किंवा उघड्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा पालिका क्षेत्रात किंवा हद्दीमध्ये जाळला जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

 

Web Title: immediately install sprinklers smog guns on 6 thousand constructions otherwise we will stop the works bmc guidlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.