मुंबई : बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी काही पोलीस कर्मचारी मृत्यु पावले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विमाकवच आणि आरोग्य विषयक सुविधा वेळेवर मिळत नसल्यामुळे एसटी कर्मचारी धास्तावले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणा-या एसटी कर्मचार्यांना ५० लाखाचे विमा कवच तातडीने देणे आवश्यक आहे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेनी केली.
कोरोना विषाणूमुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन झाले आहे. परिणामी, सर्व वाहतूक बंद आहे. राज्यात एसटीची सेवा बंद आहे. मात्र मुंबई महानगरात एसटी महामंडळाची अत्यावश्यक सेवा सुरू आहे. त्यामुळे या प्रतिकुल काळात एसटी कामगार, कर्मचारी, अधिकारी जीव मुठीत घेऊन कामाला जातात. दरम्यान, कोरोनाच्या काळात परराज्यातील अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांना परत आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या विशेष बस सोडल्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना विमाकवच नाही.आरोग्य विषयक सुविधा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची भीती बळावत आहे. विमा कवच मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक बळ येईल. त्यामुळे विमा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्रव्यवहार केला आहे. एसटी कामगार, कर्मचारी, अधिकारी यांना तत्काळ ५० लाख विमा कवच द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.