घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:38 PM2024-05-15T22:38:51+5:302024-05-15T22:40:07+5:30
दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी जोरदार वारा आणि पावसामुळे एक मोठी दुर्घटना घडली. येथील महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून त्याखाली दबून जवळपास १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर होर्डिंग मालकावर, मुंबई महानगरपालिका, रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस गृह निर्माण संस्थेतील संबंधित दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
अंबादास दानवे यांनी पत्रात म्हटले आहे की, महानगरपालिकेची होर्डिंग उभारण्याची परवानगी जास्तीत जास्त ४० X ४० असून कोसळलेले होर्डिंग १२० X १२० चौरस फूट आकाराचे असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्य होर्डिंग लावण्यास परवानगी दिली. त्या सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. सदर घडलेल्या दुर्घटनेतील जागा ही रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येते. यामध्ये बेकायदेशीर होर्डिंग्जला रेल्वे पोलीसांनी मान्यता दिल्याची माहिती आहे. त्यामुळे परवानगी देण्यात येणाऱ्या संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात यावेत व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत.
तसेच, यातील काही जागा महाराष्ट्र पोलीस गृह निर्माण संस्थेच्या ताब्यात होती. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांवर तेथील जागेची जबाबदारी होती. अशा सर्व अधिकाऱ्यांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच होर्डिंग्ज मालकाने नियमबाह्य व सुरक्षिततेचे कोणतेही नियमांचे पालन केलेले नसल्याने त्यांच्या सर्व होर्डिंग्जची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत समावेश करावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
या दुर्घटनेमध्ये जखमी व मृत्यू पावलेल्या व्यक्तींना आवश्यक ती रक्कम संबंधित होर्डिंग मालकाकडून वसूल करून देण्यात यावी. तसेच यासारख्या घटना भविष्यात घडू नये, यासाठी राज्यातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन धोकादायक होर्डिंग्ज काढण्याबाबत योग्य त्या सुचना देण्यात याव्यात. तसेच या दुदैवी घटनेत जखमी झालेल्या व्यक्ती, मृत व्यक्ती तसेच वाहने व इतर स्थावर मालमत्तेचे झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने तातडीने देण्याबाबत उचित पावले उचलावित, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.